पिंपरी : काळेवाडीतील एका अल्पवयीन मुलाला आढळून आलेली वस्तू शेजारी राहणाऱ्या तरुणाने ताब्यात घेतली. विक्री केल्यास मोठी रक्कम मिळू शकेल, अतिस्फोटक स्वरूपातील जिवंत हातबॉम्ब चक्क सव्वा महिना घरात ठेवून विक्रीसाठी तो ग्राहकाचा शोध घेत होता. हातबॉम्ब विक्रीसाठी ग्राहकाचा शोध घेत असल्याची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी बुधवारी सायंकाळी पाच वाजता विक्की अशोक सावंत (वय २५, रा. काळेवाडी, शिवकृपा कॉलनी) या आरोपीला अटक केली. बॉम्बशोधक पथकाने त्याच्याकडून बॉम्ब हस्तगत केला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. मासेमारीसाठी गेलेल्या काळेवाडीतील एका अल्पवयीन मुलाला थेरगाव केजूबाई मंदिराजवळ नदीपात्रालगत महिन्यापूर्वी अनोळखी वस्तू आढळली. कुतूहल म्हणून ती वस्तू त्याने घरी नेली. काळेवाडी शिवकृपा कॉलनीत त्याच्या शेजारी राहणाऱ्या विक्की सावंत नावाच्या तरुणाने ही वस्तू पाहिली. अल्पवयीन मुलाकडून त्याने ती वस्तू घेतली. वस्तू पाहिल्यानंतर बॉम्बसारखे काही तरी आहे, हे त्याच्या निदर्शनास आले. शेजारी राहणाऱ्या अन्य कोणाला काही कळू न देता, त्याने ही वस्तू विक्रीचा घाट घातला. ही वस्तू ज्यांना कामी येईल, अशा व्यक्तींचा तो शोध घेत होता. वस्तूची किंमत तीन लाख रुपये त्याने निश्चित केली. जिवंत हातबॉम्ब आहे, हे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने कोठेही धक्का न लावता, तोडफोड करण्याचा प्रयत्न केला नाही. अत्यंत स्फोटक अशा स्वरूपातील हातबॉम्ब घेऊन तो ग्राहकाच्या शोधार्थ फिरत राहायचा. रात्री बॉम्ब घरी ठेवत असे. हातबॉम्ब विक्रीसाठी एक तरुण वाकड परिसरात फिरत असल्याचे समजल्यानंतर खबऱ्याने ही माहिती पोलिसांना दिली. चतु:शृंगी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डी. जी. वाळुंजकर यांनी या प्रकरणी शोध घेण्यास पोलीस पथक पाठविले. मागावर असलेल्या पोलिसांनी दुपारी पावणेतीनच्या सुमारास संशयावरून ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडे जिवंत बॉम्ब सापडला. बॉम्बशोधक पथकाला वाकड येथे पाचारण करण्यात आले. बॉम्बशोधक पथकाने तरुणाकडील बॉम्ब ताब्यात घेतला. पाहणी केली असता जिवंत हातबॉम्ब असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडून बॉम्ब ताब्यात घेण्यात आला असून, हातबॉम्ब बाळगल्याप्रकरणी तरुणावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, बॉम्ब तपासणीसाठी खडकीतील अॅम्युनिशन फॅक्टरीत पाठविण्यात आला आहे.
काळेवाडीत आढळला जिवंत बॉम्ब
By admin | Updated: September 10, 2015 04:19 IST