- लक्ष्मण मोरे, पुणे‘रस्त्यांवरच्या बोचऱ्या नजरांचा सामना आम्ही करू शकतो; परंतु घरातील वासनांध नजरांचा सामना आम्ही कसा करायचा,’ हा प्रश्न आहे एका पीडित मुलीचा. महिला आणि मुली घरांमध्येही सुरक्षित आहेत की नाहीत, असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली असून, वर्षाकाठी पोलीसदप्तरी दाखल होणाऱ्या बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये नातेवाईक, पालक व शेजारीच सर्वाधिक आरोपी असल्याचे समोर आले आहे. याला अल्पवयीन मुलेही अपवाद राहिलेली नाहीत. वासनेच्या आवेगात नात्यांचा होणारा खून ही एक नवी सामाजिक समस्या पुढे येत आहे. मेट्रो सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये वर्षाकाठी साधारणपणे बलात्काराचे २००च्या आसपास गुन्हे दाखल होतात, तर विनयभंगाचे ४००च्या पुढे गुन्हे दाखल होतात. या तक्रारींमध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे. शिक्षण आणि सामाजिक चळवळींचे केंद्र असलेल्या पुण्यामध्ये या घटना वाढणे चिंतेचा विषय ठरत आहे. पोलिसांनी तीन वर्षांत अटक केलेल्या बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांमधील अटक आरोपींमध्ये सुशिक्षितांचे प्रमाण अधिक असल्याचेही वास्तव आहे.व्यसनाधीनता, ओळखीचा गैरफायदा, भावना उद्दीपित होणे यासोबतच सहजतेने उपलब्ध होत असलेल्या ‘पॉर्न मटेरियल’मुळेही हे प्रकार वाढत चालले आहेत. कौटुंबिक संस्कारांचा कमी होत चाललेला प्रभाव, नात्यांचे पावित्र्य जपण्यापेक्षा उपभोगवादी होत चाललेली वृत्ती या घटनांना कारणीभूत ठरत आहेत. ज्यांच्यासोबत अशा घटना घडलेल्या आहेत, त्या महिलांकडे कुटुंबातील अन्य पुरुष, तसेच नातेवाइकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो़ क्वचितच त्यांना मानसिक आधार दिला जातो़ त्यापेक्षा पीडित महिलांचे अधिकाधिक शोषण करण्याचेच प्रकार होत आहेत. अनेकदा बलात्कार आणि लैंगिक छळवणुकीच्या बळी ठरलेल्या महिला आणि मुलींना दादही मागता येत नाही. कुटुंबातील अन्य सदस्य दोषी नातेवाइकाला शिक्षा देण्याऐवजी पीडितेलाच शांत राहण्यासाठी दबाव टाकतात. कुटुंबाची इभ्रत आणि खोट्या प्रतिष्ठेपायी अनेक जणी दहशतीमुळे तक्रार द्यायला पुढेही येत नाहीत. बदलत्या काळात महिला स्वयंपूर्ण होत आहेत; परंतु त्यांच्यावरच्या अत्याचारांच्या संख्येत मात्र घट होताना दिसत नाही. प्रत्येक घरातील पुरुषी मानसिकता आणि स्त्री ही भोगाची वस्तू आहे, ही विचारसरणी बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.वाकड येथे गुरुवारी मुलाने स्वत:च्याच आईवर बलात्कार करून खून केल्याची घटना, यासह १६ वर्षांच्या गतिमंद मुलीवर बलात्कार करून तिच्या चेहऱ्यावर चाकूने वार करणाऱ्या वडिलांसह शेजाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. नोकरीत बढतीसाठी स्वत:च्या मुलीला बॉससोबत संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकणाऱ्या वडील आणि आजी-आजोबांविरुद्ध गुन्हा या प्रकारांनी समाजमन सुन्न झाले आहे.प्रत्येकाच्या हातामध्ये अत्याधुनिक मोबाइल फोन आहेत. या फोनमध्ये इंटरनेट वापराची सुविधा असल्यामुळे अनेक पॉर्नसाइट्स बघितल्या जातात, तसेच पॉर्नसंबंधी साहित्यही सहज उपलब्ध होते. रस्त्या-रस्त्यावर अश्लील सीडी, डीव्हीडी विकल्या जात आहेत. व्हॉट्स अॅप, फेसबुकवर अनेक अश्लील व्हिडिओ क्लिप उपलब्ध आहेत. या सर्व प्रकारांमुळे भावना उद्दीपित होणे आणि त्या आवेगात कधी नकळत, तर कधी जाणीवपूर्वक हातून गुन्हा घडणे हे प्रकार सुरू आहेत, परंतु चूक लक्षात येईपर्यंत पीडितेचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले असते. मानसिकदृष्ट्या अशा प्रकारचे गुन्हे करणारे इतके आहारी गेलेले असतात की, त्यांना नात्यांच्या मर्यादाही अडवू शकत नाहीत.बलात्काराच्या आणि विनयभंगाच्या खटल्यांमध्ये पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता होते. अनेकदा तपासातील त्रुटी आणि परिस्थितीजन्य पुरावे उपलब्ध न झाल्याने दोषारोपसिद्धी होत नाही. कायद्याच्या पळवाटांमुळेही पीडितेला न्याय मिळत नाही.सार्वजनिक ठिकाणांवर होणारी छेडछाड रोखण्यासाठी पोलिसांकडून पथके तयार करण्यात आलेली आहेत. कामाच्या ठिकाणी होणारी छळवणूक रोखण्यासाठी ‘विशाखा’ समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. निर्भयासारखी प्रकरणे घडल्यानंतर त्याचा गाजावाजा होतो. परंतु घरामध्ये पालक, नातेवाईक आणि ओळखीच्यांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचारांना वाचा फोडणे तेवढेसे सोपे नसते.एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये काळानुरूप बदल होत जाऊन आता विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात आलेली आहे. कौटुंबिक संस्कारांचा भाग कमी होत चाललेला आहे. महिलांकडे बघण्याची दृष्टी आजही बदलेली नाही. पुरुषी मानसिकतेला सध्या ‘पॉर्न’ साहित्याची जोड मिळत चालली आहे. अनोळखी व्यक्तींपेक्षा ओळखीचे, नातेवाईक, शेजारी राहणारे आणि पालक यांच्याकडूनच सर्वाधिक गुन्हे घडत आहेत. अत्याचारांपासून महिलांनी बचाव करायला शिकले पाहिजे. पीडितांनी पुढे येऊन तक्रार द्यावी. पोलीस पूर्ण संरक्षण व मदत देतील.- प्रतिभा जोशी(पोलीस निरीक्षक, महिला साहाय्य कक्ष)घरातील पुरुषांचाच महिला आणि मुलींकडे बघण्याची ‘नजर’ चांगली नसते. लोप पावत चाललेले संस्कार, पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरणामुळे या समस्या वाढत चालल्या आहेत. स्त्रियांवर आता घरामध्येही सांभाळून राहण्याची वेळ यावी, हे दुर्दैव आहे. महिलांना करिअर सांभाळताना घराच्या जबाबदाऱ्याही तेवढ्याच सक्षमतेने सांभाळाव्या लागतात. परंतु आजही महिला घरामध्येही सुरक्षित नसल्याचे वास्तव आहे. अशा अनेक प्रकरच्या तक्रारींमध्ये वाढ होत चालली आहे.- अॅड. भारती जागडे नात्यांची वीण उसवतेयनात्यांची वीण घट्ट होण्याऐवजी वासनेच्या आवेगात उसवत चालली आहे. बाल लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्येही पालक आणि नातेवाइकांकडून सर्वाधिक लैंगिक अत्याचार केले जात असल्याची आकडेवारी आहेत. पुरुषी वासनांधतेत कोवळ्या जिवांचाही विचार होऊ नये, ही समाजासाठी शरमेची बाब म्हणावी,इतपत हे गंभीर आहे.
वासनेच्या आवेगात नात्यांचा होतोय खून
By admin | Updated: September 13, 2015 01:45 IST