कोरेगाव भीमा : औद्योगीक क्षेत्रात स्वत:च्या मुलाला कामे मिळवून देण्यात चढाओढ लागली असताना भाजपाचा आमदार तळेगावात कोणाचा प्रचार करतोय, तेव्हा कुठे गेली यांची अस्मिता, यांच्या धोरणांमुळे तालुक्यात गेल्या अडीच वर्षांत मोठ्या प्रमाणात गुंडगिरी फोफावली असल्याचा आरोप शिरूर -हवेलीचे माजी आमदार अॅड. अशोक पवार यांनी केला.सणसवाडी-कोरेगाव भीमा गणाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार मोनिका हरगुुडे, जिल्हा परिषद गटाच्या कुसुम आबाराजे मांढरे, शिक्रापूर गणाच्या जयमाला जकाते यांच्या प्रचाराचा नारळ माजी आमदार अॅड. अशोक पवार यांच्या हस्ते ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात फोडण्यात आला. या वेळी बँकेच्या संचालिका वर्षा शिवले, युवकचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, घोडगगा संचालक अरुण करंजे, बाजार समितीचे संचालक दत्तात्रय हरगुडे, माजी सरपंच आबा करंजे, तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव, सोमनाथ भुजबळ, पंडित दरेकर, शिवाजी दरेकर, नामदेव दरेकर आदी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाने व मृत्युंजय ग्रुपच्या दोन हजार युवकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा सभेत दिला. अशोक पवार म्हणाले, ‘भाजपा सरकारने तरुणांना रोजगार उपलब्ध करून न देता, उलट नोटाबंदी लादत लाखो कामगारांना देशोधडीला लावले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारभाव देत नाही, अशा असंवेदनशील सरकारला जागा दाखविण्याची गरज आहे. आज महिला सबलीकरणावर भर देण्याची खरी गरज आहे,’ असेही ते म्हणाले. (वार्ताहर)
भाजपामुळे गुंडगिरी वाढली : पवार
By admin | Updated: February 13, 2017 01:25 IST