पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अनेक गट-गणांमध्ये राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाबरोबरच काँग्रेस आणि शिवसेनेला अनेक ठिकाणी उमेदवारच मिळालेले नाहीत. एका बाजूला राज्यामधील परिस्थिती आणि राजकीय घडामोडी लक्षात घेतल्या तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती तुटली आहे आणि त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. परंतु जिल्ह्यातील सर्व ठिकाणी उमेदवार देणे त्यांना शक्य झालेले दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर निवडणुकीमध्ये उमेदवारच देता आले नसतील तर आव्हान तरी कसे उभे करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेस पक्षांकडे उमेदवारांची संख्या वाढली आहे. काँगे्रसच्या वतीने मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या केवळ २५ जागांवर उमेदवार दिले होते. या वेळी ही संख्या ६० पर्यंत गेली आहे.जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँगे्रसची सत्ता आहे. या वेळी प्रथमच भाजपानेही ग्रामीण भागावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोर लावला आहे. केवळ एक दोन-तालुक्यांत अस्तित्व असलेल्या भाजपाने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी जास्तीत जास्त जागांवर उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाने राष्ट्रवादी, शिवसेनेतील काही बंडखोर उमेदवारांना पक्षात घेऊन उमेदवार देण्याची तयारी केली होती. सर्वच पक्षांनी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर न करता गुप्त पद्धतीने शेवटच्या क्षणी अधिकृत उमेदवारांना थेट एबी फॉर्म दिले. यामुळे बंडखोरी रोखण्यात चांगले यश आले. मात्र भाजपाला अनेक ठिकाणी उमेदवार मिळाले नाहीत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या ७५ जागांपैकी ७ जागांवर पक्षाकडे अधिकृत उमेदवार नाहीत. तर पंचायत समितीच्या १५० जागांपैकी १३ जागांवर भाजपाला उमेदवार मिळालेले नाहीत. काँग्रेसने ७५पैकी ६० जागांवर व पंचायत समितीच्या १५० जागांपैकी ९५ जागांवर पक्षाचे अधिकृत उमेदवार दिले आहेत. जिल्हा परिषदेसह अनेक पंचायत समित्यांमध्ये सध्या राष्ट्रवादी काँगे्रसची सत्ता आहे. यामुळे आमच्या पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती. जिल्हा परिषदेच्या ७५ आणि पंचायत समितीच्या १५० जागांवर राष्ट्रवादी काँगे्रसने सक्षम उमेदवार दिले आहेत. परंतु विरोधकांना जिल्ह्यात अनेक जागांवर उमेदवारदेखील मिळालेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँगे्रससाठी चांगले वातावरण आहे.- जालिंदर कामठे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँगे्रस महापालिकेमध्ये काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रसची आघाडी झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीतदेखील आघाडी होणार अशी चर्चा होती. परंतु जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँगे्रस हाच आमचा मुख्य विरोधक असून, पक्षाचे जिल्ह्यातील नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार संग्राम थोपट, ज्येष्ठ नेते नाना नवले आम्ही एकत्र बसून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात जास्तीत जास्त जागांवर उमेदवार देण्यात आले असून, काँगे्रसचे उमेदवार चांगल्या संख्येने निवडून येतील.- संजय जगताप, जिल्हाध्यक्ष काँगे्रस
भाजपसह, सेना, काँग्रेसने सोडल्या जागा !
By admin | Updated: February 8, 2017 02:54 IST