पुणे : पालिकेने नगरसेवकांच्या हट्टाखातर विविध रस्ते, उद्यानांमध्ये उभ्या केलेल्या ‘ओपन जिम’ सध्या धूळ खात पडून आहेत. पालिकेने कोट्यवधींचा खर्च करुन बसविलेले हे साहित्य वापराअभावी धूळ-माती बसून खराब होत असून पुन्हा त्याच्या देखभालीवर लाखोंचा खर्च केला जाण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मध्ये या ओपन जिमही बंद करण्यात आल्या होत्या. लॉक डाऊनच्या आठ महिन्यांच्या कालावधीत बंद असलेल्या आस्थापनांसह उद्याने, मंदिरे उघडण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. परंतु, उद्यानांमधील खेळणी आणि ओपन जिमच्या साहित्याचा वापर करण्यास मात्र मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे या साहित्याचा वापर नागरिकांकडून अद्याप सुरु करण्यात आलेला नसून पालिकेनेही हे साहित्य गेटच्या आत कुलूपबंद केलेले आहे.
गेल्या आठ महिन्यात उन्हाळा-पावसाळा झेललेल्या या साहित्याला आता गंज चढू लागला आहे. यापुढे आणखी किती काळ या साहित्याचा वापर करण्यास मनाई राहणार याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे हे साहित्य खराब होण्याची शक्यता वाढली आहे. पालिकेने केलेला कोट्यवधींचा खर्च वाया जाण्याची भिती आहे.