भोसरी : उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपामध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे व शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामध्ये तिकीट वाटपावरून शहकाटशाहचे राजकारण रंगले. जगताप समर्थक सारंग कामतेकर यांना उमेदवारी देऊन लांडगे यांना चेकमेट दिला. तसेच, च-होलीच्या सर्वसाधारण महिला गटातही दोघांच्या समर्थकांना एबी फार्म देण्यात आला. महापालिका निवडणुकीसाठीच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवशीही भाजपाने अधिकृत उमेदवारांची यादी रात्री उशिरापर्यंत जाहीर केली नाही. त्यामुळे भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह व इंद्रायणीनगर क्र ीडा संकुल या ठिकाणी भाजपाच्या दोन्ही गटांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. कोणत्या प्रवर्गातून उमेदवारी मिळणार हे गुलदस्त्यात असल्याने उमेदवारी अर्ज भरताना इच्छुकांची मोठी गोची झाली होती. सारंग कामतेकर व सीमा सावळे या दोघांनाही इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक आठ मध्ये उमेदवारी देऊन आमदार जगताप यांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा भोसरीत चांगलीच रंगली आहे. लांडगे समर्थक तुषार सहाणे यांचा पत्ता ऐनवेळी कट झाल्यामुळे त्यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली आहे. भाजपाच्या अंतर्गत शहकटशहाच्या राजकारणामुळे विरोधकांना फायदा होण्याची शक्यता आहे. याच प्रभाग आठमध्ये माजी आमदार विलास लांडे यांचा मुलगा विक्र ांत लांडे यांची उमेदवारी आहे. त्यामुळे या लक्षवेधी लढतीविषयी भोसरीकरांना उत्सुकता आहे. एबी फॉर्म वाटपात गोंधळ शिवसेनेकडून एकाच जागेसाठी दोघांना एबी फार्म देण्यात आला. त्यामुळे गोंधळ उडाला. त्यामुळे कोणत्याच पक्षाची उमेदवारी यादी सायंकाळी सहापर्यंत जाहीर न करता थेट एबी फार्मचे वाटप केले. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये एबी फॉर्म वाटपावरून गोंधळ झाला.(वार्ताहर)शिवसेनेला नाराजांची साथ भोसरीतील भाजपाच्या अंतर्गत गटबाजीमुळे शिवसेनेला बळ मिळाले आहे. महेश लांडगे समर्थक तुषार सहाणे यांचा पत्ता कट झाल्यामुळे त्यांनी शिवसेनेतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एका जागेसाठी दोन एबी फॉर्म भोसरीतील प्रभाग क्रमांक ३ मधील सर्वसाधारण महिला गटांत भाजपाकडून दोन एबी फॉर्म देण्यात आले आहेत. त्यामध्ये लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक व महिला शहराध्यक्ष शैला मोळक यांना आणि महेश लांडगे गटाच्या साधना सचिन तापकीर यांना एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत कोणी माघारी घ्यायची यावरून गोंधळ सुरू होता.
भोसरीत उमेदवारीवरून शह-काटशह
By admin | Updated: February 4, 2017 04:02 IST