लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: दक्षिण आफ्रिकेत आपल्या कार्यालयात बसलेले बॅरिस्टर मोहनचंद करमचंद गांधी ते दांडी यात्रेत मिठाच्या सत्याग्रहात निघालेले महात्मा गांधी आणि ३० जानेवारी १९४८ नंतर अंतिम प्रवासासाठी निघालेले राष्ट्रपिता गांधी. महात्मा गांधी यांचा हा प्रवास तब्बल १०० छायाचित्रांमधून बाळासाहेब ठाकरे कलादालनात प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.
काँग्रेसच्या वतीने प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाळासाहेब ठाकरे कलादालनात आयोजिलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी झाले. आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार उल्हास पवार, काँग्रेसचे पालिकेतील गटनेते आबा बागूल, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी या वेळी उपस्थित होते.
सबनीस म्हणाले की, गांधींजींना स्वीकारणे हा राजकीय डावपेच आहे. गांधी पचवायला हवेत. जगाला आदर्शभूत ठरलेले महात्मा गांधी आपल्या जगण्याचा श्वास व्हायला हवेत. आज संपूर्ण जग अस्वस्थ झालेले आहे. रशियावर चीनला वर्चस्व गाजवायचे आहे. चीनला भारताला त्रास द्यायचा आहे. यात लहान राष्ट्रांचा बळी जात आहे. अशा वेळी फक्त आणि फक्त महात्मा गांधी यांचे विचारच जगाला वाचवू शकतात.
महात्मा गांधीजींपासून इतरांना प्रेरणा मिळावी, त्यांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ३० जानेवारीपर्यंत रोज सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.