कर्वेनगर : कोथरूडमधील करिष्मा सोसायटीजवळील चौकात पालिका प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी लोखंडी दुभाजक बसविण्यात आले होते. यामुळे या करिष्मा चौकात वाहतूककोंडी होत नव्हती. अपघाताचे प्रमाणही काही प्रमाणात कमी झाले होेते. मात्र आता अपघातात वाढ तर झाली आहेच. त्याशिवाय कोंडीसही दुभाजक कारणीभूत ठरत आहे. कारण या दुभाजकाची दुरवस्था झाली असून, ते तुटले आहेत. यामुळे वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे. कोथरूडकडून करिष्मा सोसायटीकडे वळताना हे लोखंडी बार काही प्रमाणात बाहेर आले आहेत. यामुळे हे बार दुचाकी, चारचाकी वाहनांना घासून जात आहेत. यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. हा चौक कोथरूड विभागातील प्रमुख चौकांपैकी एक चौक आहे. हे दुभाजक पुणे शहर तसेच मनपा कार्यालयाकडे जाण्याच्या रस्त्यावर आहेत. या ठिकाणी अनेक वेळा वाहतूक पोलीस उपस्थित नसतात. बऱ्याच वेळा ते एका बाजूला कोपऱ्यात उभे असतात. त्यामुळे वाहतूक समस्येत भर पडत आहे. त्यामुळे तुटलेला दुभाजक त्वरित दुरुस्त करावा, वाहतूक पोलीस नियमित या ठिकाणी असावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
लोखंडी दुभाजकाचा वाहतुकीस अडथळा
By admin | Updated: December 26, 2016 03:43 IST