बारामती : उदासीन पोलीस प्रशासनामुळे शहरात बेशिस्त वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे व्यापारीवर्गाबरोबरच नागरिक त्रस्त आहेत. पार्किंगच्या जागेतील अतिक्रमण, बेशिस्त वाहतुकीमुळे यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीमुळे गर्दी वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय तर प्रशासनाची दमछाक होणार आहे. पार्किंगची प्रभावी व्यवस्था उभारण्याची मागणी वाहनचालकांमधून होत आहे.सध्या केवळ भिगवण चौकातील सिग्नल यंत्रणा सुरू आहे. मात्र, त्यामध्येदेखील सातत्य नसते. त्यामुळे भर चौकात होणारी वाहतुकीची कोंडी डोकेदुखी बनते. विशेषत: शहरातील शाळा सुटल्यानंतर सर्व वाहने या चौकात एकत्र येतात. त्यामुळे कोंडीत भर पडते. त्यातून व्यापार पेठांमध्ये वाहतुकीच्या कोंडीचे चित्र कायमच दिसू लागले आहे. महावीर पथ येथे एकेरी वाहतूक करण्यास चारचाकी, तीनचाकी वाहनांना मुभा आहे. मात्र, गुणवडी चौकाच्या दिशेने बेशिस्त वाहने सुरूच असतात. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी नियमित होत आहे.ती व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी बनली आहे. शहरातील महत्त्वाची दुकाने या मार्गावर आहेत. त्यामुळे या मार्गावर बारामती शहरासह आसपासच्या गावांमधील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. शहरातील सर्वाधिक गर्दीचा हा मार्ग आहे. या मार्गावर दुतर्फा दुचाकी लावल्या जातात. गांधी चौक ते गुणवडी चौकादरम्यान एकेरी वाहतूक आहे. गुणवडी चौकाच्या दिशेने जाण्यास चारचाकी, तीनचाकी वाहनांना पूर्णपणे बंदी आहे. या बंदीचा फलक गांधी चौकात लावण्यात आला होता. याशिवाय वाहतूक पोलिसांचेदेखील त्यावर नियंत्रण होते. मात्र, सध्या हे चित्र बदलले आहे. एकेरी वाहतूक दर्शवणारा फलक येथून काढण्यात आला आहे. या ठिकाणी वाहतुकीचे नियंत्रण ठेवणारे पोलीस कर्मचारी अभावानेच दिसून येतात. त्यामुळे या मार्गावरील बेशिस्त वाहतूक वाढत आहे. त्यातून चुकीच्या दिशेने चारचाकी वाहनचालक जातात. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात नाही. त्यातून वाहनांची मोठी कोंडी होते. येथील एकेरी वाहतुकीचा फलक पूर्ववत लावण्यात यावा, बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. एमआयडीसीतील पेन्सिल चौकात वेगळे चित्र नाही. या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे; मात्र ही यंत्रणा बंद आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह कंपनीमध्ये जाणारी अवजड वाहने, कामगार यामुळे चौकामध्ये अपघाताची भीती आहे. (प्रतिनिधी)
बारामतीची ‘कोंडी’ वाढतेय
By admin | Updated: October 27, 2015 00:52 IST