शहरात ४ -जी लाइन्स असलेल्या कंपनीमार्फत ही सेवा देता येणार आहे. नगरपालिकेला त्यामध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायची नाही. फक्त हॉट स्पॉट तयार करण्यासाठी लागणारे राऊटर्स उभा करण्यासाठी पालिकेने परवानगी द्यायची आहे. या सेवेसाठी रिलायन्स जिओ कंपनीने बारामती नगरपालिकेला प्रस्ताव दिला आहे. या ठरावाला आज मंजुरी देण्यात आली. बारामती शहरात वाय-फाय सुविधा देताना संपूर्ण शहराचा समतोल राखावा, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले यांनी केली. शहर वाय-फाय होत असताना शहरातील सर्व भाग हाय-फाय झाला पाहिजे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शहराचा डावीकडचा भाग सतत स्वच्छ असतो. मात्र, उजवीकडच्या मोठ्या नागरीवस्त्यांमध्ये दैनंदिन स्वच्छता नसते. त्यामुळे बारामतीची ‘दुसरी बाजू’ ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होते. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. ठेकेदारी पद्धतीने स्वच्छता कामगार घेतले आहे. त्यांच्याकडून आठवड्यातून किमान एकदा तरी संपूर्ण बारामती कचरामुक्त करावी, असे त्यांनी सांगितले. नगरसेवक किरण गुजर यांनी ढोले यांच्या सूचनेची अंमलबजावणी करावी, असे सांगितले. शहरातील जुन्या हद्दीत भुयारी गटार योजना, ११.५० एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रकल्प देखील हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा निधी उपलब्ध होणार आहे. या योजनेसाठी आतापर्यंत ३ कोटी ९६ लाख १५ हजार रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. योजनेच्या सुधारित आर्थिक तरतुदीनुसार निधी केंद्र शासनाकडून उपलब्ध होणार आहे. मात्र, राज्य शासनाने निधीच्या बाबतीत आखलेले धोरण निश्चित झाले नाही. त्यामुळे ही योजना पूर्ण होण्यासाठी नगरपालिका निधीतून तरतूद करणे गरजेचे आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामुळे नदीतील प्रदूषण थांबणार आहे. (प्रतिनिधी)
बारामती होणार वायफाय!
By admin | Updated: October 31, 2015 01:13 IST