महेंद्र कांबळे, बारामती - पंचायत समितीच्या छोटे पाटबंधारे उपविभागाने बारामती तालुक्यामध्ये सन २०१२-१३ ते सन २०१३-१४ अखेरपर्यंत ओढा खोलीकरण व सरळीकरण करण्याची कामे पूर्ण केलेली आहेत. तसेच, गावांची कामे लोक सहभागातून प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे बारामती तालुक्यातील गावांमध्ये टँकरची संख्या कमी करण्यात यश आलेले आहे. पाणी अडविण्याच्या व जिरवण्याच्या या उपाययोजनेमुळे आगामी काळात टँकरमुक्तीच्या दिशेने तालुका जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. बारामती तालुक्याच्या जिरायती भागात सतत ३ वर्षे पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची टंचाई जाणवली. आजही काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे महसूल, पंचायत समिती, स्वयंसेवी संस्था आणि लोक सहभागातून ओढे, नाले खोलीकरण, रुंदीकरण करण्यावर दोन वर्षांत भर दिला. या उपक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष लक्ष देऊन महसूल, कृषी, छोटे पाटबंधारे विभागाच्या संयुक्त विद्यमाने जलस्रोत बळकट करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. ज्या गावांमध्ये ओढ्यांचे खोलीकरण, रुंदीकरण झाले आहे. या पावसाळ्यात आणखी पाणी वाढण्याची व मुरण्याची क्षमता असेल, असे सांगण्यात आले. या खोलीकरणामुळे वळण बंधारे व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यासाठी जागा उपलब्ध झाल्यामुळे या कामांचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे. अंदाजपत्रके तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्यामुळे भविष्यात टंचाई निर्माण होणार नाही. गावे टँकरमुक्त होण्यासाठी ओढ्यावरील अतिक्रमणे काढण्याची कामे प्रामुख्याने करावी लागतात. त्यासाठी महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग व गावांचा सहभाग घेण्यात येत आहे, अशी माहिती जगदाळे यांनी दिली. सिंचन क्षेत्र वाढल्यामुळे भविष्यात पाणीसाठा निर्माण करावे लागणार आहेत. त्यासाठी लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन एल. एस. जगदाळे व छोटे पाटबंधारे उपविभागाचे शाखा अभियंता ए. ए. कोकरे यांनी केले आहे.
तर बारामतीला टँँकरची गरज नाही!
By admin | Updated: June 2, 2014 01:26 IST