तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये तळेघर येथे एकमेव असणारी भारतीय स्टेट बँक या राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा बंद झाल्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेला संपूर्ण बँकेचा सेटअप व त्यामध्ये असलेली यंत्रसामग्री धूळ खात पडली आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आदिवासी जनतेची आर्थिक गरज, त्याचप्रमाणे आर्थिक उलाढाल भागविण्यासाठी १९८२मध्ये राष्ट्रीयीकृत बँक म्हणून भारतीय स्टेट बँकेची एक शाखा तळेघर येथे सुरू करण्यात आली. या बँकेच्या स्थापनेमुळे या आदिवासी भागातील पाटण, आहुपे व भीमाशंकर या खोऱ्यांतील आदिवासी बांधवांची आर्थिक उलाढाल व त्याबाबतच्या समस्या संपल्या होत्या. सलग २५ वर्षे बँकेचे दैनंदिन व्यवहार सुरळीत व नियमित चालल्यामुळे या बँकेचे व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले; परंतु त्यावेळी दहा-बारा वर्षे याच शाखेमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी भारतीय स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता तळेघर येथील शाखा ६० किलोमीटरवर असणाऱ्या मंचर येथे हलवली. यानंतर याच अधिकाऱ्यांनी २००३-०४मध्ये या बँकेच्या जागेवर भारतीय स्टेट बँकेचे चलित कार्यालय सुरू केले. यासाठी मोठ्या प्रमाणात लाखो रुपये खर्च करून इंटरनेट सेटअप डिश, वातानुकूलित यंत्रसामग्री, संगणक त्याचप्रमाणे मागडी यंत्रसामग्री उभारण्यात आली. यानंतर हे अधिकारी मंचर येथून आठवड्यातून मंगळवार, गुरुवार व शुक्रवारी असे तीन दिवस येऊन कामकाज करीत असत. दोन-तीन वर्षे या तीन दिवसांनंतर फक्त एकच दिवस तळेघर आठवडेबाजारात असणाऱ्या गुरुवार या दिवशी मंचर येथून येऊन काम करीत असत. यानंतर गेल्या आठ-दहा वर्षांपासून महिन्यांतून कधीतरी एक दिवस फक्त अर्धा ते एक तास येऊन हे कार्यालय उघडले जाते. यामुळे या कार्यालयासाठी उभारण्यात आलेल्या लाखो रुपयांचा सेटअप व यंत्रसामग्री धूळ खात पडली आहे. आॅनलाईनसाठी उभारण्यात आलेल्या इंटरनेट सेटअपवर त्याचप्रमाणे डिश व अवतीभवती शेवाळ व गवत उगवले असून, लाखो रुपयांचा केलेला खर्च वाया गेला आहे.(वार्ताहर)
तळेघरची बँक शाखा बंदच
By admin | Updated: January 25, 2017 01:23 IST