बारामती : येथील महिला आणि बालविकास विभागाच्या प्रेरणा महिला स्वीकार केंद्रातून ८ बांगलादेशी महिला पळून गेल्या. त्यांपैकी तिघींना ताब्यात घेण्यात आले आहे. खोलीच्या खिडकीचे स्क्रू काढून ग्रील उचकटून त्या फरार झाल्या आहेत. ५ जणींचा अद्याप शोध लागलेला नाही. ‘पिटा’अंतर्गत या महिलांवर कारवाई करण्यात आली होती. महंमदवाडी येथील रेस्क्यू फाउंडेशन केंद्रात या महिला वास्तव्यास होत्या. त्या ठिकाणी तोडफोड करून ३८ पैकी १९ महिला पळून गेल्या होत्या. या महिलांचा शोध घेऊन न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या महिलांची जामिनावर मुक्तता केल्यानंतर बारामती येथील महिला स्वीकार केंद्रा त्यांना दाखल करण्याचे आदेश दिले होते. या महिलांना इमारतीमधील पंडिता रमाबाई हॉलमध्ये ठेवण्यात आले होते. हा हॉल इमारतीच्या तळमजल्यावर आहे. रविवारी (दि. १०) रात्री रूमच्या खिडकीचे स्क्रू काढून ग्रिल उचकटून वाकवले. त्यानंतर बेडशीटच्या साह्याने या महिला खिडकीतून खाली उतरल्या. या इमारतीची संरक्षक भिंत एका बाजूने अपूर्ण आहे. या ठिकाणी इमारतीमागून धावत जाऊन त्या खुल्या जागेतून पळून गेल्या. या महिलांना पळून जाताना येथील महिला कर्मचाऱ्याने पाहिल्यानंतर त्यांचा पाठलाग केला. या वेळी नर्गिस नर्सिंग बारीक शेख (वय २०, रा. बांगलादेश) हिला केंद्राच्या आवारातच ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर प्रभारी महिला अधिकारी टी. एल. माशाळे यांना हा प्रकार कळविण्यात आला. या वेळी पोलिसांसह कर्मचाऱ्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि. ११) सकाळी मोरगाव टोलनाक्यावर नादिरा अफजल मुल्ला (वय २४), आनंदी आक्तर मुक्त (वय २०) या दोघींना ताब्यात घेण्यात आले. तर, पपिया रसूल मुल्ला (वय २०), काजल ऊर्फ मीना जुलूस मंडल (वय २३), जायदा ऊर्फ सुमी कुर्दुसमाल (वय ३१), हालिमा युसूफ मुल्ला ऊर्फ हालिमा कातून हाजीर (वय २६), झारना हसन हाजी (वय २५, सर्व रा. बांगलादेश) या पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. रविवारी (दि. १०) सायंकाळी साडेसातच्या सुमारास येथील महिला कर्मचारी रेखा गावडे या मुलींना जेवण वाढत होत्या. याच वेळी त्यांना इमारतीच्या पाठीमागे धावणाऱ्या पावलांचा भास झाला. त्यांनी खिडकीतून पाहिल्यानंतर या महिला पळून जाताना दिसल्या. य ावेळी त्यांनी धाव घेऊन एका मुलीला पकडले. मात्र, इतर ७ जणी पळून जाण्यात यशस्वी झाल्या. पुणे पोलीस महिलांपुढे हतबल...९ जानेवारी २०१६ रोजी या मुलींना घेऊन जाण्यासाठी पोलीस पथक आले होते; मात्र या बांगलादेशी महिलांनी आरडाओरडा आदळआपट करीत जाण्यास नकार दिला. ‘साथ जिएंगे, साथ रहेंगे’ असे म्हणत न जाण्यावर या महिला ठाम होत्या. दोन तास या बांगलादेशी मुलींचा गोंधळ सुरू होता. शेवटी या मुलींना पुणे येथे घेऊन जाण्यासाठी आलेले पोलिसांचे पथक रिकाम्या हाताने माघारी गेले. ‘हमे बांगलादेश जाना हैं’ असे या महिला येथील महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना सांगत होत्या.एकत्र ठेवण्याचा आग्रह ...बांगलादेशी महिलांना बारामती येथील स्वीकार केंद्रात आणल्यानंतर एक दिवस त्यांनी जेवणाला हातदेखील लावला नाही. येथील महिला अधिकाऱ्यांनी संवाद साधल्यानंतर त्यांनी जेवण केले. ‘आम्हा सर्व जणींना एकत्रच ठेवा. इतर रूममध्ये आम्ही राहणार नाही. वेगवेगळे तर राहणारच नाही,’ अशी भूमिका बांगलादेशी महिलांनी येथील केंद्रात वास्तव्यादरम्यान घेतल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
बांगलादेशी महिला केंद्रातून पळाल्या!
By admin | Updated: January 16, 2016 02:40 IST