रविवारी गणेश विसर्जन पार पडणार आहे. शासनाच्या सूचनेनुसार गणेश विसर्जन मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. मागील वर्षी ज्याप्रमाणे विसर्जन कुंड व निर्माल्य कुंड याचे नियोजन केले होते. यावर्षीही त्याच प्रमाणे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. गणेश विसर्जन घाट या ठिकाणी कोणीही गर्दी करणार नाही. गणेश विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी मंचर पोलीस ठाणे व मंचर ग्रामपंचायत यांच्या वतीने गणेश मूर्ती ठेवण्यासाठी मंचर शहरात ट्रॅक्टर ट्रॉली ठेवण्यात येणार आहे. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळे व घरगुती गणेश मूर्ती या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ठेवण्यात याव्यात. या गणेशमूर्तीचे विसर्जन ग्रामपंचायत मंचर व मंचर पोलीस स्टेशन यांच्यामार्फत कळंब येथील घाटावर करण्यात येणार आहे.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने ४३ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसेच दोघांना तडीपार करण्यात आले आहे. गणेश विसर्जनासाठी एक पोलीस निरीक्षक,दोन सहायक पोलीस निरीक्षक,पाच पोलीस उपनिरीक्षक, ३० पोलीस अंमलदार, चार महिला पोलीस, एक स्ट्रायकिंग पथक, २८ होमगार्ड व १५ विशेष पोलीस अधिकारी असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.