कोरेगाव भीमा: येथील भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची गेल्या कित्येक वर्षापासून दुरुस्ती न झाल्याने बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. त्यातच बंधाऱ्याचे ३१९ पैकी २७९ ढापे कुजले असल्याने त्यातुन मोठ्याप्रमाणात गळती झाल्याने नदीचे पाणी शेतक-यांसह उद्योगधंद्यांना कमी पडत आहे. या बंधा-याची पाटबंधारे विभाग दुरुस्ती करणार तरी कधी? असा सवाल उपस्थित केला जात असून यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
भीमा नदीच्या पाण्यावर वाघोली , पेरणे , लोणीकंद , सणसवाडी , यासह खाजगी पेयजल योजना व स्थानीक उद्योगधंदे अवलंबुन असतात. दरवर्षी डिसेंबर ते एप्रील दरम्यान खऱ्या अर्थाने पाण्याची जास्त आवश्यकता असताना कोरेगाव भीमा-पेरणे येथील बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर येत असतो. या बंधाऱ्यावर लागणाऱ्या ३१९ लोखंडी ढाप्यांपैकी केवळ ४० ढापेच वापरण्यायोग्य आहेत. त्यापैकी २७९ ढापे गंजुन कुजले असुन मोठमोठे छिद्र पडल्याने पाणी बंधाऱ्यात टिकत नाही. त्यातच बंधाऱ्याच्या पुर्वेकडील बाजुच्या भिंतींनाही मोठ्याप्रमाणात तडा गेल्यानेही पाण्याच्या गळतीचे प्रमाण खुप असुनही पाठबंधारे विभाग मात्र जाणीवपूर्वक कोरेगाव भीमा बंधाऱ्याकडे दुर्लक्ष करित आहेत.
भीमा नदीतील बंधाऱ्याच्या पश्चिम बाजूने ढापे( लोखंडी गेट) बसवताना तेथील बाभळीची खोडे,झाडाच्या फांद्या व इतर मोठ्या प्रमाणावर साठलेला कचरा काढण्याची तसदी कर्मचाऱ्यानी घेतली नाही. बंधारा दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतसह स्थानिक शेतकरी पाठबंधारे विभागाकडे वारंवार मागणी करुनही पाठबंधारे बंधारे विभाग शेतकऱ्यांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा लावित असल्याने याबाबत वरिष्ठ कार्यालय व लोकप्रतिनिधीनींही लक्ष घालण्याची मागणी स्वराज राष्ट्रनिर्माण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशसिंह ढेरंगे, अमीर इनामदार, दत्तात्रय भाऊसाहेब गव्हाणे, अशोक ढेरंगे, तानाजी ढेरंगे , कोळी यांनी केली आहे.
चौकट :
बंधाऱ्याच्या दुरुस्तीसह कठडेही बांधावे
शेतकऱ्यांसाठी संजीवनी असणाऱ्या कोरेगाव भीमा-पेरणे बंधाऱ्यांकडे पाटबंधारे विभाग जाणीवपुर्वक दुर्लक्ष करित असुन बंधाऱ्याच्या दुरवस्तेची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करुन बंधा-याची तात्काळ दुरुस्ती करण्याची व बंधाऱ्यावर कठडे बसविण्याचीही मागणी स्वराज राष्ट्रनिर्माण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशसिंह ढेरंगे यांनी केली आहे.
फोटो
०३ कोरेगाव भीमा
कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथिल कोल्हापुरी पध्दतीच्या बंधा-याच्या दुवस्थेमुळे लागलेली गळती दाखविताना ग्रामस्थ (छाया : सुनिल भांडवलकर)