पुणे : ज्येष्ठ उद्योजक हरकचंदजी केशरचंदजी ऊर्फ बाबूशेठ पारख (वय ८५) यांचे गुरुवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले़ वयोमानानुसार त्रास होत असल्याने त्यांना ४ दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात दाखल केले होते़ तेथे उपचार सुरू असतानाच आज सकाळी सहाच्या सुमारास त्यांचे निधन झाले़ त्यांच्या मागे पत्नी पताशीबाई, चिरंजीव प्रकाश, सुरेश तसेच मुली, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे़ हरकचंदजी पारख यांचा जन्म ३० आॅक्टोबर १९३० रोजी खेड तालुक्यातील दावडी या गावी झाला़ सुरुवातीला त्यांनी सायकलवरून फिरून किराणा व्यापार केला़ त्यानंतर पुण्यात आल्यावर चाकण आॅईल मिलमध्ये बरीच वर्षे काम केले़ तेथील अनुभवानंतर त्यांनी पूना डाळ अँड बेसन मिलची स्थापना केली़ या कंपनीमार्फत डाळ, बेसन यांच्या उत्पादनास सुरुवात केली़ सम्राट बेसन हा बँ्रड त्यांनी लोकप्रिय केला़ पारख फूड या कंपनीची स्थापना करून त्यांनी डाळ, बेसन, आटा, तेल यांचे उत्पादन सुरू केले़ जेमिनी हा खाद्यतेलाचा ब्रँड त्यांनी लोकप्रिय केला आहे़ महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात विविध ठिकाणी प्रकल्प उभारून वितरकांचे मोठे जाळे तयार केले आणि संपूर्ण भारतभरात नावलौकिक मिळविला़ व्यापार, उद्योगाबरोबरच त्यांनी अनेक संस्थांना भरघोस मदतीचा हात दिला़ महावीर प्रतिष्ठानचे ते संस्थापक अध्यक्ष होते़ आनंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच साधना सदन श्री संघाचे ते उपाध्यक्ष होते़ पारख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता महर्षीनगर येथील महावीर प्रतिष्ठान येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे़
बाबूशेठ पारख यांचे निधन
By admin | Updated: July 10, 2015 02:20 IST