पुणे: ‘‘दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका मिळणार आहे, त्यामुळे आधी ती शांतपणे वाचून घे, कोणता प्रश्न कधी सोडवायचा त्याचे नियोजन कर, मग वेळेत प्रश्नपत्रिका सोडव...,’’ अशा सूचना देणारे पालक आणि बैठक क्रमांक शोधण्यासाठी परीक्षा केंद्रात धावाधाव करणारे विद्यार्थी. तर, पहिला पेपर मराठीचाच चांगला सोडव, अशा एकमेकांना शुभेच्छा देणारे मित्र, असे चित्र मंगळवारी विविध शाळांसमोर दिसून आले.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवारी दहावीची परीक्षा सुरू करण्यात आली. विविध परीक्षा केंद्रांवर सकाळी दहापासूनच पालकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक स्वत: विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडविण्यासाठी आले होते. बोर्डाचा पहिलाच पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये थोडी धाकधूक होती. पालक विद्यार्थ्यांची समजूत काढून शांतपणे पेपर सोडवं, मराठीचा पेपर आहे घाबरू नकोस. प्रश्नपत्रिका मिळाली की ती पहिल्यांदा वाचून काढ, अकरा वाजल्याशिवाय उत्तर लिहिण्यास सुरूवात करू नकोस, असे सांगताना दिसत होते.जयेश वाखरे या विद्यार्थ्याने सांगितले, ‘‘दहा मिनेटे प्रश्नपत्रिका अगोदर दिल्यामुळे ती वाचून कोणता प्रश्न कधी सोडवावा, याचे नियोजन करता आले.’’ तसेच प्रतीक्षा डोंगरे म्हणाली, ‘‘प्रश्नपत्रिका वाचण्यास वेळ मिळाल्यामुळे विचार करता आला. कोणता प्रश्न कधी सोडवावा, याचा निर्णय घेण्यास पुरेसा अवधी मिळाला. त्यामुळे सर्व प्रश्नपत्रिका वेळेत सोडवता आली.’’दुपारी परीक्षा केंद्राबाहेर पडल्यानंतर अनेक विद्यार्थी व त्यांचे पालक दुसरा पेपर कोणत्या परीक्षा केंद्रावर आहे, याची माहिती घेताना दिसत होते. तर, कोणते कोणते प्रश्न सोडविले, असे विचारून काही पालक परीक्षा केंद्रावरच मुलांची शाळा घेत असल्याचेही चित्र दिसून आले. (प्रतिनिधी)४मुले परीक्षा केंद्रात गेल्यानंतर पालकांची अस्वस्थता वाढली होती. मात्र, परीक्षा देऊन आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून पालकांची अस्वस्थता कमी झाली. ‘‘बाबा, पेपर सोप्पा गेला...,सर्व प्रश्न वेळेत सोडवले. चांगले मार्क पडतील,’’ असे मुलांनी सांगताच पालक मोकळा श्वास सोडत होते.