चिंचवड : रोटरी क्लब, चिंचवड यांच्या वतीने आयोजित शिशिर व्याख्यानमालेतील कार्यक्रमात आपल्या अनोख्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत ठसा उमटविणाऱ्या मकरंद अनासपुरे यांना कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी चित्रपट क्षेत्रातील अनुभवांच्या गमतीजमती व नाम फाउंडेशनच्या सामाजिक जाणिवेतून होत असलेल्या कार्याबाबत अनासपुरेंनी भावना व्यक्त केल्या.चिंचवडमधील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित शिशिर व्याख्यानमालेचे २०वे वर्ष आहे. या वेळी झालेल्या प्रकट मुलाखतीत अनासपुरे यांनी खास शैलीत उत्तरे दिली. डॉ. शिल्पा गणपुले यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी चित्रपट व सामाजिक क्षेत्रातील प्रवास उलगडला. हौशी रंगमंचालाच मी सर्वश्रेष्ठ मानतो असे ते म्हणाले.या मंचावर व्यवहार नसतो. यातून धाडस निर्माण होते, असे म्हणत त्यांनी आपल्या जीवनातील अनेक प्रसंग मांडले.विनोदाच्या माध्यमातून उपास्थितांची मने जिंकली.नाम फाउंडेशनच्या कामात समाजाचे योगदान असल्याचे सांगत त्यांनी ही आपली जबाबदारी असल्याचे सांगितले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब,दुष्काळ,हुंडापद्धती, शिक्षण, रोजगार,सामुदायिक विवाह पद्धतीबाबत जागृत राहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर भागात सैनिकांच्या मुलांसाठी शाळा उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील भागात झालेली कामे व पुढील नियोजन याबाबत माहिती दिली. ग्रामीण भागात महिला ग्राम सेवा केंद्राच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या प्रसंगी नाम फाउंडेशनला एक लाख रुपयांचा धनादेश मदतनिधीसाठी देण्यात आला.या वेळी अध्यक्ष अरविंद गोडसे, डॉ. अच्युत कलंत्रे,राजन लाखे,मलिनाथ कलशेट्टी,संजीव दाते आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रीती वैद्य व रोनाल्ड डेव्हिड यांना सेवागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह,पुष्पगुच्छ व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.समाजात क्षयरोगाबाबत जागृती व्हावी यासाठी डॉ. अमृता दाते यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन अनासपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. (वार्ताहर)
मकरंद अनासपुरे यांना पुरस्कार प्रदान
By admin | Updated: January 14, 2017 02:37 IST