पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीवर आकर्षक परतावा मिळवून देण्याच्या अमिषाने गुंतवणूक करण्यास भाग पाडत खात्याची खोटी माहिती सांगून बनावट नफातोटा पत्रके तयार करून ती ई-मेलद्वारे पाठवून खोटे संदेश पाठवत ४००हून अधिक नागरिकांची १६ कोटी १६ लाख ९५ हजार ४७० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लेखा परीक्षकाला (सी.ए.) अटक केली असून त्याला २ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी दिला.
कैलास राधाकिसन मुंदडा (वय ४२, रा. सिंहगड रोड) असे त्याचे नाव आहे. यापूर्वी, मुख्य आरोपी महेशकुमार लोहिया (वय ३१), सुनील सोमानी (वय ५४), गजानन माने (वय ३०) या तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत ५१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. नोव्हेंबर २०१६ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत शुक्रवार पेठ परिसरात ही घटना घडली. फिर्यादींनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी दिलेला १० लाख रुपयांचा धनादेश महेशकुमार याने त्याच्या बँक खात्यात जमा केला. या प्रकरणात ४०० हून अधिक लोकांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मुंदडा याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील मारूती वाडेकर यांनी केली.
गुंतवणूकदारांना फायदा होण्याचे अमिष दाखवून त्याने गुंतवणूक करण्यास भाग पाडले आहे. मुख्य आरोपीकडून त्याने १ कोटी १० लाख ६२ हजार ४४ रुपये स्वीकारल्याचे फॉरेन्सिक लेखा परीक्षण अहवालात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी अँड. वाडेकर यांनी केली.