लोणी काळभोर : गुन्ह्यात हवा असणारा तसेच ६ वर्षांपासून फरारी असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांस ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने जेरबंद केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी दिली. उमेश लक्ष्मण आहेर (वय २६, रा. वाघापूर, ता. पुरंदर, जि. पुणे) या तरुणाला जेरबंद करून लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. २०१० पासून लोणी काळभोरचा उमेश आहेर पोलिसांना दरोड्याच्या गुन्ह्यात हवा होता. तो कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या कवडीपाट टोलनाक्यावर येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलीस पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने कवडीपाट टोलनाक्यावर सापळा रचला होता. तेथे उमेश आहेर येताच त्याला या पथकाने जेरबंद केले.आहेर पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर दरोडा आणि दरोडा टाकण्याच्या प्रयत्नाचे गुन्हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
अट्टल दरोडेखोरास लोणी काळभोरला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2016 03:47 IST