न्हावरे : न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी आमदार अशोक रावसाहेब पवार यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी मांडवगण फराटा गटातून दुसऱ्यांदा संचालक म्हणून निवडून आलेले बाबासाहेब रामभाऊ फराटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अस्मिता मोरे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. अशोक पवार सलग १७ वर्षांपासून घोडगंगा कारखान्याच्या अध्यक्षपदावर कामकाज करत असून, कारखान्याच्या उभारणीकाळात देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने २१ पैकी २१ जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्या होत्या. उपाध्यक्षपद कारखान्याच्या संचालकांना प्रत्येकी एक वर्षासाठी देण्यात येणार आहे.अध्यक्ष अशोक पवार निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, सभासदांनी ज्या विश्वासाने कारखान्याची एकहाती सत्ता दिली आहे. सभासदांच्या उसाला चांगला भाव देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. कारखान्याचा को-जन प्रकल्प लवकरच सुरू होत असून, घोडगंगा साखर कारखान्याचा राज्यातील साखर उद्योगात चांगला नावलौकिक वाढीस लागण्यासाठी नवनिर्वाचित संचालक मंडळ प्रयत्नशील राहील. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत विजयोत्सव साजरा केला. नवनिर्वाचित अध्यक्ष-उपाध्यक्ष व संचालकांचा कामगार व सभासदांच्या वतीने सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)