पुणे : “बाहेरील शत्रूंबरोबर देशाअंतर्गत शत्रू देखील बरेच आहेत. त्यातच देशाला दुर्देवाने भ्रष्टाचाराचा शाप आहे. अशाही परिस्थितीत महाराष्ट्र पोलीस दलाचे नेतृत्व करताना अरविंद इनामदार यांनी मूल्यांचा आग्रह धरला आणि स्वत:च्या ३६ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये दीपस्तंभासारखे काम केले. या साऱ्याचे प्रतिबिंब उमटलेला इनामदार यांच्यावरील स्मृतिग्रंथ केवळ आजी-माजी पोलीस अधिकाऱ्यांनाच नव्हे तर समाजातील सज्जनशक्तीला प्रेरणा देणारा आहे,” असे गौरवोद्गार भारतीय हवाई दलाचे निवृत्त उपप्रमुख एअरमार्शल भूषण गोखले यांनी काढले.
राज्याचे माजी पोलीस महासंचालक, आयपीएस अधिकारी अरविंद इनामदार यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त सह्याद्री प्रकाशनाचे ‘राम राम देवा’ या डॉ. सागर देशपांडे यांनी संपादित केलेल्या स्मृतिग्रंथाच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. माजी पोलीस महासंचालक वसंतराव सराफ अध्यक्षस्थानी होते. सीआयडीचे प्रमुख अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, मुंबईचे रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, स्मृतिग्रंथाचे संपादक डॉ. सागर देशपांडे आणि सह्याद्री प्रकाशनाच्या संचालक स्मिता देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.
लष्करी दलांमध्ये पोलीस खात्याच्या तुलनेत राजकारण्यांचा हस्तक्षेप नसतो. त्यामुळे तिथली परिस्थिती अजून चांगली आहे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र पोलीस दलाची स्थिती बरी आहे, असे निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले म्हणाले. सीआयडी विभागाच्या पुण्यातील कार्यालय परिसरात उभारलेल्या क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकासाठी इनामदारांनी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.
कुलकर्णी, सेनगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. अमिताभ गुप्ता आणि सेवानिवृत्त कर्मचारी मोहन यादव यांनी इनामदार यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक डॉ. सागर देशपांडे यांनी केले. अनिरूद्ध दडके यांनी सूत्रसंचालन केले. शर्वरी देशपांडे यांनी आभार मानले.