पुणे : कलासंस्कृती परिवाराच्या वतीने बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या स्टार आॅफ स्क्रीन पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांना कलाकृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चांदीची कुंडी, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.याच कार्यक्रमात बाबा शिंदे, तन्मय पेंडसे, विवेक दामले, भारत कुमावत, प्रवीण जोशी यांना समाजसंस्कृती पुरस्कार तर यशवंत भुवड व शिवानंद आक्के यांना निकोप सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पडद्यामागील कलाकार अनिल शेलार, बाळू शेलार, बाळू भोकरे, अमित इंगळकर, विठ्ठल सलगर, चंद्रकांत भंडारी, नितीन पोपळभट व जगदीश जगदाळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या धावपटू आणि चित्रपटनिर्मात्या मिशेल काकडे यांनाही विशेष पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, चारुदत्त सरपोतदार आणि सुधीर मांडके यांची विशेष उपस्थित होती. कलासंस्कृती परिवार आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी प्रास्ताविक केले. संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले.विनोदी स्कीट्स, नृत्याविष्कार, दिव्यांचा झगमगाट अशा मनोहारी वातावरणाने रसिकांना खिळवून ठेवले होते. तेजा देवकर हिच्या ‘वंदे मातरम्’ने सोहळ्याला प्रारंभ झाला. ‘टॉमी आणि नवरा’ याचा फरक सांगणाऱ्या किशोरी आंबिये आणि विनोद खेडकर यांच्या विनोदी स्कीटने रसिकांना पोट धरून हसायला लावले. भार्गवी चिरमुले हिने सुलोचना दीदींचा काळ नृत्यातून उलगडला. गिरिजा जोशी, अभ्यंग कवळेकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी नृत्याविष्कार सादर केला. या पुरस्कार सोहळ्याच्या रूपात मराठी चित्रपटसृष्टीतले तारेच जणू जमिनीवर अवतरले होते. सुशांत शेलार, पूजा पवार, प्रवीण तरडे, डॉ. विलास उजवणे आदी विविध ३० कलाकार सोहळ्यात सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)
सुलोचना यांना कलाकृतज्ञता पुरस्कार
By admin | Updated: January 26, 2017 00:55 IST