पुणे : हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली पुण्यातील साठ पर्यटकांना ३० लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी राकेश रामब्रीज वर्मा (वय २७, रा. हडपसर) याला सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. फसवणुकीसाठी त्याने एक संकेतस्थळाची निर्मिती केली होती. याप्रकरणी धानोरीमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना एक दिवस जुकासो कंपनीच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त विमाननगर येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये मोफत जेवण व भेटवस्तू असल्याचा फोन आला होता. त्यानुसार हॉटेलमध्ये पोहोचलेल्या फिर्यादी यांना वर्मा याने भेटून हॉटेलसोबत करार झाल्याची माहिती दिली. त्याच्यासोबत असलेल्या संदीप कनोजिया नावाच्या व्यक्तीने फिर्यादी, तसेच त्यांच्याप्रमाणे आलेल्या अन्य तक्रारदारांना हॉलिडे पॅकेजीसची माहिती दिली. फिर्यादी यांनी २० हजार रुपये भरून एक पॅकेज घेतले. पॅकेज घेऊनही त्यांना तसेच अन्य सभासदांना कोणत्याही सुविधा देण्यात आल्या नाहीत. त्यांनी वर्मा व संदीपशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाईल बंद झालेले होते. याबाबत सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली.
पर्यटकांना गंडा घालणाऱ्यास अटक
By admin | Updated: February 14, 2017 02:16 IST