बारामती : मागील तीन महिन्यांपूर्वी दौंड तालुक्यातील दुहेरी खून व दरोड्यांचा तपास करण्यात बारामती गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. या प्रकरणी काष्टी (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) येथून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडून ७९ हजार १०० रुपयांचा मुद्देमालदेखील जप्त करण्यात आला आहे.एप्रिल महिन्यात दौंड तालुक्यातील बोरीभडक, खोरवाडी, लोणकरवस्ती आदी ठिकाणी दरोडा पडला होता. या प्रकरणी बारामती गुन्हे शोध पथकाने सागर यादया पवार, सल्या आदिती चव्हाण, कुच्या (पूर्ण नाव माहिती नाही) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींचा नावे आहेत. बोरीभडक येथील दरोड्यात पडस्थळ (ता. इंदापूर) येथील वृद्ध मजूर दाम्पत्य तुकाराम यशवंत गोडगे व रुक्मिणी तुकाराम गोडगे यांचा आरोपींनी धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून केला होता व ६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत रामभाऊ तुकाराम गोडगे यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच ठाकूरवस्ती, म्हसाणेवाडी (ता. दौंड) येथील महादेव मारुती लोणकर यांच्या घरावरदेखील आरोपींनी दरोडा घातला होता. लोणकर कुटुंबीयांना मारहाण करून रोख रक्कम व तीन तोळ्याचे दागिने असा १ लाख १२ हजारांचा ऐवज दरोडेखोरांनी लांबवला होता. त्याचप्रमाणा खोरवाडी येथील अर्चना कल्याण धावडे यांच्या घरावरदेखील दरोडा घालण्यात आला होता. रोख रक्कम व सोन्याचे दागिने मिळून १ लाख ८० हजारांचा ऐवज चोरून नेला होता.आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी अन्य ८ साथीदारांसह गुन्हे केल्याची कबुली दिली.बारामती गुन्हे शोध पथकातील सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, शिवाजी निकम, बाळासाहेब भोई, अनिल काळे, संदीपमोकाशी, रविराज कोकरे, सुभाष डोईफोडे, संदीप जाधव, दशरथ कोळेकर, तुषार सानप, सदाशिव बंडगर, आसीफ शेख, हरि होले, सुनील सस्ते यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर करीत आहेत.
दौंड तालुक्यात धुमाकूळ घालणारे दरोडेखोर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 05:54 IST