पुणे : युतीची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेने स्वबळावर लढण्याची तयारी म्हणून विधानसभा मतदारसंघनिहाय प्रभागांच्या बैठका सुरू केल्या असून, उमेदवारांच्या प्रचाराचे मुद्दे, पक्षाचे उद्दिष्ट, प्रचाराची पद्धत यासंदर्भात या बैठकांमध्ये ऊहापोह करण्यात येत आहे. पक्षाचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी सावधगिरी म्हणून हा पवित्रा घेतला आहे. विधानसभा निवडणुकांच्या वेळीही युती होईल, या अपेक्षेवर शिवसेनेने काही हालचाली केल्या नव्हत्या, त्यामुळे पक्षाला धोका झाला, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकीत त्याचा पुन:प्रत्यय नको, यासाठी निम्हण यांनी पुढाकार घेतला आहे. सर्व प्रभागांमध्ये तयारी करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना करण्याचे ठरविले असल्याचे सांगण्यात आले. बुधवारी हडपसर व वडगाव शेरीतील १३ प्रभागांमध्ये बैठकांचे आयोजन केले होते. कोथरुड व शिवाजीनगर मतदारसंघातील बैठकाही पार पडल्या. ६ विधानसभा मतदारसंघांमधील सर्व प्रभागांच्या बैठका पूर्ण झाल्या असून, त्या त्या प्रभागात पक्षाने केलेल्या तयारीचा आढावा, निवडणुकांना कसे सामोरे जावे, याची तयारी, मतदारयाद्यांची तपासणी आदींचा ऊहापोह करण्यात आला. निम्हण म्हणाले सर्व ८ विधानसभा मतदारसंघांमधील सर्व प्रभागांमध्ये तयारी करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. युती होणार किंवा कसे, याचा निर्णय मुंबईतून होईल.
सेनेची स्वबळाची तयारी सुरु
By admin | Updated: January 23, 2017 03:25 IST