सोमेश्वरनगर : नीरानजीक गुळुंचे गावात पाच सशस्त्र दरोडेखोरांनी मध्यरात्री दरोडा घातला. गुळुंचे गावचे माजी सरपंच गणेश पोपट कर्णवर, शिवाजी कोंडिराम निगडे, तर हनुमंत विनायक निगडे यांच्या घरांवर दरोडा टाकून ५ जणांना जखमी केले.जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून : गणेश कर्णवर यांच्या घरांत रात्री दोनच्या सुमारास हे दरोडेखोर शिरले. त्यांनी सोने-चांदी व रोख रकमेची लूट केली आहे. घरातील सर्व जण साखरझोपेत असताना बंगल्याच्या टेरेसवरील दार तोडून दरोडेखोर थेट घरात शिरले. शस्त्रांचा धाक दाखवून सोने व रोख रकमेची मागणी करू लागले. दरम्यान, गणेश यांच्या पत्नीने अंगावरील रोज वापराचे मिनी गंठण व कर्णफुले देऊ केली. अन्य कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे १ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज ताब्यात घेऊन दरोडेखोर निघाले होते. या वेळी घरातील कर्णवर यांचे वडील पोपट कर्णवर (वय ६५) व पार्वती दशरथ कर्णवर (वय ८५) यांच्यावर आरडाओरडा केला, म्हणून हल्ला करीत जबर मारहाण केली. त्यानंतर चोरट्यांनी शिवाजी कोंडिराम निगडे यांच्या घरातील दागिन्यांसह रोख १८ हजार ५०० रुपयांचा ऐवज, तसेच हनुमंत विनायक निगडे यांच्या घरातील अडकवलेल्या पँटच्या खिशातून रोख रुपये १६०० घेऊन पलायन केले. सुमारे १ लाख ८५ हजार १०० रुपयांची घरफोडी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुळुंचे गावात सशस्त्र दरोडा
By admin | Updated: September 8, 2016 01:57 IST