रविकिरण सासवडे, बारामतीपिकाच्या गरजेनुसारच पाणी दिले जावे, असा कृषितज्ज्ञांचा सल्ला सर्वच शेतकरी अमलात आणताना दिसत नाही. पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनी क्षारपड होण्याचा धोकाही अधिक आहे. मात्र, बागायती क्षेत्रात पाण्याची मुबलक उपलब्धता असल्याने शेतकरी पिकाला अतिरिक्त पाणी देत आहेत. बारामती तालुक्यातच या अतिरिक्त पाणीवापरामुळे अंदाजे साडेतीन ते चार हजार क्षेत्र क्षारपड झाले आहे. त्यामुळे जलसाक्षरता आणि जलनियंत्रणाच्या चळवळी व्यापक प्रमाणावर राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. दरवर्षीच पाऊसकाळ लांबत आहे. त्यामुळे दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शासनस्तरावरून जलयुक्त शिवारसारख्या योजना लोकसहभागातून राबवल्या जात आहेत. पाणी साठवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असतानाच पाण्याच्या वापरावरही योग्य नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. गावपातळीपासून जलयुक्त शिवार योजनेला प्रतिसाद मिळत आहे. जलस्रोत बळकटीकरणाला त्यामुळे चालना मिळाली. पडणाऱ्या पावसाचा थेंब न् थेंब साठवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्याबरोबरच पाणी वापरतानादेखील थेंबाचाही विचार करण्याची गरज आहे. उसासारख्या पिकाला एकरी एकावेळी पाटाद्वारे १० ते १२ लाख लिटर पाणी लागते. तर ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्यास २६ ते २७ हजार लिटर पाणी लागते. मात्र, शेतकरी पाणी आहे म्हणून ठिबकने देखील अतिरिक्त पाणी देत आहेत. पिकांची गरज ओळखून तज्ज्ञांच्या सल्ल्याने पाणीवापराबाबत काटेकोर नियोजन केल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते. त्याचप्रमाणे जमिनीची स्थिती, पाण्याची उपलब्धता, हवामान याचा विचार करता पीक पद्धती ठरवण्याची गरज आहे.
अतिरिक्त पाण्यामुळे क्षारपड जमिनींचे क्षेत्र वाढले
By admin | Updated: August 6, 2015 03:39 IST