(इंटिरिअर डिझायनर व वास्तुतज्ज्ञ)
कोणतीही वास्तू म्हटली की त्याचे वास्तुशास्त्र आलेच मग ती वास्तु कमर्शिअल असो अथवा रेसिडेंशियल असो, वास्तू छोटी असो अथवा मोठी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी यशासाठी व प्रगतीसाठी आरोग्यदायी जीवनासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्र नियमाप्रमाणे असणे अत्यंत आवश्यक आहे. पण सध्याच्या वन रूम किचन, टू रूम किचनमध्ये वास्तुशास्त्र पाळणे तसे अवघडच. वास्तुशास्त्र न पाळलेल्या वास्तूमध्ये अनेक प्रकारच्या समस्या, कौटुंबिक कलह, कटकटी वाद-विवाद, अपयश, अनारोग्य , निराशा अशा विविध समस्या दिसून येतात. त्यामुळे वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तू असणे ही काळाची गरज यशाचा व प्रगतीचा मार्ग आहे. वास्तुशास्त्र प्रामुख्याने नऊ खंडांवर आधारित असल्यामुळे आपण या नऊ खंडाची अंतर्गत वास्तुरचना, इंटिरियर, फर्निचरची रंगसंगती इ. या लेखा अंतर्गत थोडक्यात पाहू.
ईशान्य दिशा ही वास्तुशास्त्रामध्ये पूजनीय मानली गेली आहे. त्यामुळे ईशान्य खंडात मुख्यत्वे प्रवेशद्वार भूमिगत पाण्याचा साठा किंवा बोरिंग असावी. या खंडामध्ये जास्तीत जास्त दरवाजे व खिडक्यांची रचना अशा प्रकारे करावी की ज्यामुळे सकाळची सूर्याचे सौम्य सूर्यकिरणे मोठ्या प्रमाणात वास्तूत येतील. या सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे डी जीवनसत्वामुळे सर्व वातावरण निर्जंतुक होते. त्यामुळे त्या वास्तूमध्ये वास्तव्य करणाऱ्या सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहण्यास निश्चितच मदत होऊन वास्तू आरोग्यदायी होईल. पूजा स्थानाची (देवघराची) रचना ईशान्य खंडातच करावी. मंदिर शक्यतो लाकडाचे असावे मंदिराला कळस नसावा मंदिराचे तोंड पश्चिमेला व पूजा करणाऱ्याचे तोंड पूर्वेकडे असावे. उत्तर पूर्व व ईशान्य खंडात हॉल दिवाणखाना व बैठक व्यवस्था करताना तोंड शक्यतो पूर्वेकडे व उत्तरेकडे होईल अशी रचना असावी. पूर्व, उत्तर व ईशान्य या तिन्ही खंडातील फर्निचर वजनाने हलके कमी उंचीचे कमी आकाराचे व आकारमानाचे असावे. जलतत्वाचे प्रतीक निर्माण करणारे डिझाईन्स असावे. फर्निचरच्या लॅमिनेटचे रंग पांढरा, चंदेरी, मोती कलर, ऑफ व्हाईट अथवा फिक्कट हिरव्या रंगाची रंगसंगती करावी.
आग्नेय खंडातील वास्तुरचना करताना प्रामुख्याने स्वंपाकगृह त्याच बरोबर अग्नीशी संबंधित सर्व व्यवस्था या खंडात करावी. इलेक्ट्रिकल उपकरणे, जनरेटर आग्नेय दिशेत असावेत. या खंडातील फर्निचर भिंती व पडद्यांना लालसर, नारंगी, फिक्कट गुलाबी रंगाची अग्नीशी संबंधित रंगसंगती असावी. फर्निचरचे आकार, आकारमान व उंची नैर्ऋत्य दक्षिण व पश्चिमे पेक्षा कमी असावी व उत्तर, ईशान्य पूर्वे पेक्षा जास्त असावी. अग्नि खंडांमध्ये दोष असू नये कारण आग्नेय दिशा स्त्रीत्वाची व आरोग्याशी संबंधित आहे. ज्याप्रमाणे चुकून अग्नीला हात लागला तर भाजतेच इजा होते अगदी त्याचप्रमाणे चुकून आग्नेय खंडात वास्तुदोष झाला तर त्याचा त्रास होतोच.
नैर्ऋत्य व दक्षिण खंडाची वास्तुरचना करताना त्या ठिकाणी शक्यतो जिना अडगळीची खोली स्टोअर रूम असावे. कमीत कमी खिडक्या व दरवाजे असावेत. नैर्ऋत्य खंडात मास्टर बेडरूम असावी. या खंडातील फर्निचर करताना फर्निचर आयताकृती व चौकोनी असावे इतर सर्व खंडापेक्षा उंच सिलिंगपर्यंत उंच असावे. जड व मोठ्या आकाराचे व आकारमानाचे असावे. या खंडातील रंगसंगती करताना डार्क ब्राऊन ग्रे रंगाचे फर्निचर पडदे व भिंतीचा रंग असावा या खंडामध्ये फर्निचर करताना मोठ्या आकारमानाचे त्याचबरोबर जास्तीत जास्त स्टोरेज या भागांमध्ये असल्यास जडत्वाच्या नियमांचे पालन होईल याची काळजी घ्यावी. पश्चिम व वायव्य खंडाची रचना करताना टॉयलेट मुलांची बेडरूम स्टडी रूम गेस्टरूम भोजनगृह असल्यास शुभ फळं मिळतात. या दिशेचे फर्निचर मध्यम उंचीचे असावे फर्निचरचा आकार उभट आयताकृती असावा. या खंडातील फर्निचर पडदे व भिंतींची रंगसंगती ग्रे, निळसर, ब्राऊन रंगाची केल्यास या दिशेचे फळे मिळण्यास मदत होते.
वास्तूच्या मध्यावरील एक नवमांश भागास ब्रह्मस्थान म्हणतात. ब्रह्मस्थान नेहमी स्वच्छ सुंदर वजन विरहित मोकळे असल्यास अतिउत्तम. ब्रह्म स्थानात खड्डा उंचवटा किचन बेडरूम टॉयलेट मंदिर आशा कोणत्याही प्रकारची वास्तुरचना करू नये. ब्रह्मस्थानत रंगसंगती करताना पांढरा पिवळसर ऑफ व्हाईट रंगसंगती जास्त लाभदायी ठरते. अशा प्रकारे खंडाच्या तत्त्वानुसार योग्य ती वास्तुरचना, इंटिरियर व रंगसंगती केल्यास त्या वास्तूमध्ये सकारात्मक एनर्जी निर्माण होऊन त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या सर्व सदस्यांना सर्व प्रकारची सुख-समृद्धी, आरोग्य व आनंद मिळून वास्तू लाभदायी होऊ शकते.