लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हवामान विभागाने एप्रिल ते जून महिन्यातील उन्हाळ्याचा अंदाज जाहीर केला असून त्यात पश्चिम भारतात रात्रीचे तापमान अधिक राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पुणे शहरात एप्रिल महिना हा पुणेकरांना अधिक तापदायक ठरण्याची शक्यता आहे.
पुणे शहरात एप्रिल महिन्यातील काही दिवस हे नेहमी अंगाची लाही लाही करणारे ठरत आले आहेत. त्यानुसार यंदाही एप्रिल महिन्याचे तापमान हे नेहमीपेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता आहे.
मार्च महिन्यात पुण्याचे तापमान हे सरासरी ३६ आणि १६.५ अंश सेल्सिअस असते. पण यंदा मार्च महिना हा अधिक तापदायक ठरला आहे. २९ मार्च रोजी पुण्यात कमाल तापमान ३९.३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते. त्याचवेळी लोहगाव येथे ४०.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते.
दिवसाच्या तापमानात वाढ झाली असली तरी रात्रीचे तापमान मात्र आल्हाददायक होते. वातावरणात गारवा होता. काही दिवस तर राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुण्यात नोंदविले गेले होते.
बुधवारी पुण्यात कमाल ३८.७ आणि किमान तापमान १४.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा २ अंशाने अधिक असतानाच रात्रीच्या तापमानात मात्र सरासरीच्या तुलनेत तब्बल ३ अंशाने घट झाल्याचे दिसून आले.
असा राहील आगामी आठवडा
पुणे शहरात पुढील आठवड्यात आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे. दिवसा व रात्रीच्या तापमानात वाढ होऊन ते ४० आणि १८ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
असा राहील एप्रिल
पुणे शहरात एप्रिल महिन्यात कमाल तापमान सरासरी ३८.१ आणि किमान तापमान २०.७ अंश सेल्सिअस असते. यंदा मात्र, त्यात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच एप्रिल महिन्यात ४ दिवस वादळी वा-यासह गडगडाट होत असतो. यंदाही उत्तरार्थात ढगांच्या गडगडाटासह हलक्या वळवाच्या पावसाची शक्यता आहे.