बारामती : सणसर (ता. इंदापूर) येथील शेतीच्या वादावरून झालेल्या मारहाणी प्रकरणी नितीन अशोक निंबाळकर, विश्वास मारुती निंबाळकर, मालोजी संभाजी गायकवाड, संकेत निंबाळकर व जगन्नाथ माने या ५ जणांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन आज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला.या प्रकरणात भवानीनगर पोलिसांनी नितीन निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून सूर्यकांत निंबाळकर, त्यांचा मुलगा तुषार निंबाळकर व पत्नी सुवर्णा निंबाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या तिघांना अटक केली होती. इंदापूरच्या न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.दुसरीकडे सूर्यकांत निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून नितीन अशोक निंबाळकर, विश्वास मारुती निंबाळकर, मालोजी संभाजी गायकवाड, संकेत निंबाळकर व जगन्नाथ माने यांच्याविरोधात पोलिसांनी गज, तलवार, काठीने मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी वरील पाच जणांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. के. कदम यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. याची सुनावणी न्यायाधीश कदम यांच्यासमोर झाली. यामध्ये तलवार व गजाने डोक्यावर वार केलेले असल्याने गुन्हा गंभीर आहे व गुन्ह्यातील हत्यारे व वापरलेली वाहने जप्त करावयाची असल्याने अटकपूर्व जामीन देऊ नये, असा युक्तिवाद सरकारी वकील अॅड. मनोहर चौधरी व अॅड. किशोर लोखंडे यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधिशांनी सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून पाच जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. (वार्ताहर)
अटकपूर्व जामीन फेटाळला
By admin | Updated: June 18, 2015 22:55 IST