घोडेगाव : माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबीयांच्या २५ वारसांना तात्पुरत्या निवारा शेडचे वाटप यापूर्वी केले होते. राहिलेल्या व बाहेरगावी असलेल्यांसाठी आणखी १५ शेड बांधली असून, त्यांचे वाटप करण्यात आले. ही शेड शिल्लक राहिलेल्या कुटुंबांचे वास्तव्य पाहून एक शेड ३ जणांना विभागून दिले असून, ३३ कुटुंबे त्यामध्ये वसविण्यात आली आहेत.३० जुलै रोजी माळीण गावावर डोंगर कोसळून १५१ लोक मृत्युमुखी पडले. त्यांच्या वारसांना राहण्यासाठी माळीण फाट्यावर पत्र्याची तात्पुरती निवारा शेड बांधण्यात आली आहेत. दि. ५ आॅक्टोबर रोजी येथे राहणाऱ्यांना प्राधान्य देऊन २५ निवारा शेड वाटण्यात आली होती. तर, नोकरीनिमित्त बाहेरगावी असणाऱ्यांना मागे ठेवण्यात आले होते.उरलेल्यांसाठी नव्याने १५ शेड बांधली आहेत. त्यात रस्ते, पाणी, वीज यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या शेडचे वाटप प्रांत अधिकारी कल्याणराव पांढरे, तहसीलदार बी. जी. गोरे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता एस. बी. देवढे, शाखा अभियंता जे. डी. कचरे, नायब तहसीलदार धनंजय भांगरे, तलाठी गणेश रोकडे, सरपंच दिगंबर भालचिम, शिराजभाई पठाण, कोतवाल अरुण तळपे आदींच्या हस्ते करण्यात आले. ( वार्ताहर)कायमस्वरूपी पुनर्वसन जीएसआयचा अहवाल न आल्यामुळे झांजरेवाडी की कशाळवाडी, यामध्ये अडकला आहे. झांजरेवाडी जागेसाठी जीएसआयचा सकारात्मक अहवाल आहे; मात्र कायमस्वरूपी पुनर्वसन झांजरेवाडीत नको, तर कशाळवाडीत व्हावे, अशी मागणी माळीणचे ग्रामस्थ करीत आहेत. कशाळवाडीची जागा जीएसआयचे तज्ज्ञ पाहून गेले आहेत; मात्र त्यांचा अहवाल अजूनही आलेला नसल्यामुळे जागेचा निर्णय रखडला आहे.