लोकमत न्यूज नेटवर्क
नीरा :
नीरानजीकच्या पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील पाडेगाव भवानी आईच्या चढावर करणी, भूतबाधा उतरवण्याचा दावा करून सर्वसामान्यांना लुबाडणाऱ्या भोंदू देवरूषी विठ्ठल किसन गायकवाड व त्याची पत्नी यांच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यान्वये लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा अंनिस व लोणंद पोलीस यानी संयुक्तरीत्या कारवाई करुन या भोंदू महाराजाला ताब्यात घेतले आहे.
विठ्ठल किसन गायकवाड (रा. क्षेत्र पाडेगाव ता.खंडाळा) हे करणी, भूतबाधा उतरवण्याचा दावा करुन गेल्या दोन अडीच वर्षापासून स्वत:च्या अंगात दत्त संचारला आहे असे सांगून दर मंगळवार, शुक्रवार, अमावास्या व पौर्णिमा या दिवशी दरबार भरवून येणाऱ्या भक्तांच्या करणी काढणे, भूतबाधा काढणे, मूल न होणे, कोणतीही शारीरिक समस्या, आदी समस्यावर दैवी उपाय सांगत फसवणुक करत होते. ही माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रशांत पोतदार यांना मिळाली. त्यांनी त्याचे सहकारी डॉ. दीपक माने, अँड हौसेराव धुमाळ यांच्यासह गायकवाड यांच्या थेट दरबारात गुप्तपणे साध्या वेशात भक्त बनून स्वत:च्या समस्यांचा पाढा वाचला. यावर तुमच्यावर करणी झाली आहे, नागिणीचा त्रास आहे, ८ महिन्यात शंभर टक्के मुल होईल असे गायकवाड यांनी सांगितले. तसेच ११ फेऱ्या करायला लावल्या. यावरून अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या हे लक्षात आले की गायकवाड हे तेथे येणाऱ्या नागरिकांची आर्थिक, मानसिक फसवणूक करत आहेत. यानंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी ही बाब अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांना कळवली. धीरज पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीषक संतोष चौधरी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. शनिवारी अंनिसचे कार्यकर्ते व लोणंद पोलिस यांनी भोंदू बाबाचा दरबार गाठला. अमावास्या असल्याने दरबारात मोठ्या प्रमाणात भक्त आलेले होते. गायकवाड यांच्या अंगात देवाचा संचार आणून समस्या सोडवणे सुरू होते. लोणंद पोलिसांनी हा प्रकार बघताच गायकवाड यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे.
चौकट
नीरा परिसरात अशाच पद्धतीने एका भोंदूबाबाने आपले मोठे प्रस्थ उभे केले आहे. या बाबाकडे मोठ्या संख्येने उच्चभ्रू लोकांचा राबता असतो. मागील वर्षी या बाबाने हेलिकॉप्टरने फुलांची उधळण करून घेतली होती. या बाबाकडे तर राजकीय, शासकीय व पोलीस सेवेतील लोकांचा राबता असतो. पुणे जिल्ह्यातील अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या बाबाचे पितळ उघडे करावे अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केली.