पुणे : महापालिकेच्या विषय समित्यांमध्ये संधी देताना कसलीच चर्चा किंवा विचारविनिमय झाला नसल्याने काँग्रेसच्या सदस्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. मावळत्या सभागृहात ज्यांना संधी मिळाली होती, त्यांचीच पुन्हा नव्या सभागृहातही निवड करून ज्येष्ठ आबा बागूल यांच्यासह काहीजणांना बाजूला ठेवण्यात आले असून गटबाजीतूनच हा निर्णय झाला असल्याची चर्चा आहे.पक्षाचे गटनेते म्हणून निवड झालेले अरविंद शिंदे याआधीच्या सभागृहात गेली सलग ५ वर्षे विरोधी पक्षनेते व गटनेते म्हणून कार्यरत होते. तरीही पुन्हा पक्षाने गटनेतेपदासाठी शिंदे यांचीच निवड केली. त्यांनीही ती स्वीकारली. स्थायी समितीमध्ये सदस्य म्हणून संधी मिळालेले अविनाश बागवे याआधीच्या सभागृहात स्थायी समितीचे सलग २ वर्षे सदस्य होते. आताही पुन्हा त्यांना स्थायी समितीमध्ये संधी देण्यात आली आहे. आताच्या सभागृहात उपमहापौरपदाची उमेदवारी दिलेल्या लता राजगुरू याआधीच्या सभागृहातही विविध समित्यांवर सदस्य म्हणून कार्यरत होत्या. आताही त्यांना शहर सुधारणा समितीत सदस्य म्हणून पाठवण्यात आले आहे. चंद्रकांत कदम यांना क्रीडा समितीवर सदस्य म्हणून घेण्यात आले आहे. तेही याआधीच्या सभागृहात काही समित्यांवर होतेच. चांदबी सय्यद यांनी महिला बाल कल्याण समिती देण्यात आली आहे. पक्षातील व सभागृहातीलही सर्वांत ज्येष्ठ सदस्य आबा बागूल, नगरसेविका सुजाता शेट्टी, वैशाली मराठे व पुरस्कृत नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना एकाही समितीत स्थान दिले गेलेले नाही. (प्रतिनिधी)
काँग्रेसमध्ये नाराजी
By admin | Updated: March 22, 2017 03:36 IST