पुणे : पल्स पोलिओ असो की पोषण आहार, निवडणुकीचे काम असो की स्वच्छता मोहीम अशी अनेक कामे करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाच गेल्या सहा-सात महिन्यांपासून शासनाने एक रुपयाची दमडीदेखील दिलेली नाही. हजारो अंगणवाडी ‘ताई’चे घर त्यांच्या पगारावरच चालते, त्यात आता दसरा-दिवाळीसारखे सण देखील आल,े पण शासन पगार देण्याचे नाव घेत नाही. ‘अच्छे दिन’चा नारा देणाऱ्या भाजपा सरकारच्या काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना चांगले दिवस कधी येणार, असा सवाल अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी केला आहे. जिल्ह्यात सुमारे साडेचार हजार अंगणवाडी सेविका आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. याबाबत जिल्हा परिषदेकडे विचारणा केली असता, शासनाकडून अनुदान आले नाही, क्लार्क नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, असे शिवसेनेचे बाळासाहेब देशपांडे यांनी सांगितले. याबाबत देशपांडे आणि स्थानिक लोकाधिकार समितीचे उपाध्यक्ष दिलीप फडके यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवदेन देऊन दसऱ्यापूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पगार न दिल्यास एकही अंगणवाडी उघडू दिली जाणार नसल्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)
अंगणवाडीताई सहा महिने पगाराविना
By admin | Updated: October 13, 2015 00:36 IST