पुणे : नाटकाची सगळी प्रक्रिया ही रसिकांच्याच साक्षीने होते. हीच रंगमंचाची मजा आहे. या नाटकाच्या बॉण्डिंगची आणि पोकळीची एक चटकच लागत गेली, तो जिवंत, उत्साहवर्धक अनुभव घेण्याचे जणू व्यसनच लागले आणि ‘मी नाटकाची व्यसनी झाले’ असे सांगत कलाकारांना रंगभूमीवरील सर्व प्रांतांत अनुभवसंपन्न दृष्टिकोनातून विहार करायला लावणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी व दिग्दर्शिका विजया मेहता यांनी आपल्या ‘बाई’ या बिरूदाचे अवकाश उपस्थितांसमोर हळुवारपणे उलगडले. पुलोत्सवाच्या समारोपात रविवारी विजया मेहता यांच्या ‘बाई’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी नयनीश देशपांडे, आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव आणि कृष्णकांत गोयल उपस्थित होते. अजित भुरे यांनी मेहता यांच्याशी साधलेल्या संवादातून गुरू-शिष्यांमध्ये निर्माण झालेला स्नेहबंध, रंगभूमीकडे पाहण्याची त्यांची दृष्टी असे अनेक पैलू खुलवीत नेले. विजयाबार्इंनी ‘संध्याछाया’ नाटकादरम्यान लेखक जयवंत दळवी यांनी त्यांच्याविषयी ‘बाई आमची अनपढ आहे’ ही साहित्य वाचत नाही, पण नाटक हातात पडल्यावर रिसर्च ट्यूनसारखी त्यात मश्गूल होते, असं म्हटल्याचा उल्लेख केला; पण याच अनपढ बाईवर दोन पुस्तकं लिहिली गेली आहेत आणि ती वाचली जात आहेत, हे सांगण्यासही त्या विसरल्या नाहीत. एकत्र सहवास आणि अनुभव यातून कलाकार आणि माझ्यात एक स्नेहबंध तयार झाला आहे. यासाठी वेळ कुणाला आहे, हे म्हणणे मला पटत नाही. प्रश्न वेळेचा नसतो दृष्टिकोनाचा असतो. आज मालिका, चित्रपटांमुळे कलाकारांना वेळच कुठे असतो. पण वेळेचे नियोजन हे करता आले पाहिजे. हाती नसलेल्या कामाला वेळ नसेल तर ते करू नये किंवा कोणतीही गोष्ट उरकायची म्हणून ती करता कामा नये. स्वत:चा किंवा दुसऱ्याचा वेळ घालवणे गुन्ह्यासारखे आहे, असे त्या म्हणाल्या.
अन् मी नाटकाची व्यसनी झाले
By admin | Updated: November 14, 2016 06:52 IST