फुरसुंगी : उरुळी देवाची व फुरसुंगी येथील ग्रामस्थांची पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासोबत सोमवारी झालेल्या बैठकीत ५०० टन सुका कचरा टाकण्यास संमती दिली होती. मात्र मंगळवारी पालकमंत्र्यांच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या ग्रामस्थांनी कचरा गाड्या अडविल्या. त्यानंतर पोलीस अधिकारी, महापालिका प्रशासन यांच्यासमवेत झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत पालकमंत्र्यांची भेट घालून द्या, असे सांगून कचरा टाकण्यास परवानी दिली. मंगळवारी ४० गाड्या कचरा टाकण्यात आला. उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये कचरा टाकू देणे ग्रामस्थांनी १ जानेवारीपासून बंद केले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीत त्यांनी ९ महिने कचरा टाकू देण्यास परवानगी दिली होती. मात्र काही अटींचे पालन न झाल्याने कचरा टाकू दिला जात नव्हता. दरम्यानच्या काळात महापौर दत्तात्रय धनकवडे यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता. दोन महिन्यांपासून कचरा प्रश्न गंभीर बनल्याने गिरीश बापट यांनी ग्रामस्थांची तातडीने बैठक बोलावली. मात्र दोन्ही गावांचे सरपंच तसेच संघर्ष समितीचे बहुसंख्य पदाधिकारी याला अनुपस्थित राहिले. या बैठकीत रोज ५०० टन कचरा टाकू देण्यास उपस्थित राहिलेल्या ग्रामस्थांनी मान्यता दिली होती. त्यानुसार मंगळवारी कचरा गाड्या डेपोत गेल्या असता गाडीचालकाला गुलाबपुष्प देऊन गाड्या परत पाठविण्यात आल्या. त्यानंतर आंदोलनकर्ते व पोलीस अधिकारी राजन भोगले, पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप व ग्रामस्थांची बैठक झाली. यावेळी भगवान भाडळे, तात्या भाडळे, डॉ. बाळासाहेब हरपळे, विजय भाडळे, अनंता भाडळे, पल्लवी बाजारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)परस्पर विरोधी भूमिकापालकमंत्री गिरीश बापट यांच्यासमवेत झालेल्या बैठकीला दोन्ही गावांचे सरपंच तसेच संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित नव्हते, त्यामुळे पालकमंत्र्यांशी पुन्हा भेट व्हावी अशी मागणी या वेळी ग्रामस्थांनी केली. महापालिका प्रशासनाकडून त्यांची मागणी मान्य करण्यात आल्यानंतर गावकऱ्यांनी कचरा टाकण्यास संमती दिली. पालकमंत्र्यांच्या बैठकीत सरपंच अनुपस्थित असल्याचा मुद्दा मांडणाऱ्या ग्रामस्थांनी पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याशी चर्चा करायची नसल्याचे या बैठकीत स्पष्ट करीत परस्पर विरोधी भूमिका घेतली.
संमतीनंतरही गावकऱ्यांचा विरोध
By admin | Updated: March 4, 2015 00:31 IST