लोकमत न्यूज नेटवर्कपाटस : कानगाव (ता. दौंड) येथील वीजपुरवठा १५ दिवसांपासून सुरळीत नाही; त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची पिके जळून चालली आहेत. याबाबत सरपंच संपत फडके, दौंड तालुका राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष माऊली शेळके आणि ग्रामस्थांनी महावितरणविरोधात कानगाव येथील विठ्ठल मंदिरात आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. या आंदोलनाला केडगाव विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप भोळे यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी उपोषणकर्त्याच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी ग्रामस्थांनी विद्युत उपकेंद्र मंजुरीबाबतची सध्याची परिस्थिती, शेतीपंपाला ८ तास सलग वीजपुरवठा मिळावा, गावठाण हद्दीतील जुन्या पथदिव्यांची दुरुस्ती करावी, सिंगल फेजिंगची कामे करावीत, अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या. या वेळी कार्यकारी अभियंता दिलीप भोळे यांनी उपोषणकर्त्यांना आपल्या मागण्या वरिष्ठांपर्यंत कळवतो आणि तुमच्या समस्या कमी करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करतो, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले.या वेळी झालेल्या चर्चेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा प्रवक्ते भानुदास शिंदे, दौंड तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विकास खळदकर, राहुल चाबुकस्वार यांनी भाग घेतला. या वेळी उपसरपंच बापूराव कोऱ्हाळे, भीमा-पाटसचे संचालक राजेंद्र गवळी, भास्कर फडके, दत्तात्रय मळेकर, अंकुश गवळी, विद्युत वितरणचे स्वप्निल साळुंके, लाईनमन भुजबळ यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. केवळ खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतीला पाणी देणे कठीण झाले आहे. परिणामी, शेतातील हातातोंडाशी आलेले उभी पिके जळून चालली आहेत.
आश्वासनानंतर कानगाव ग्रामस्थांचे उपोषण मागे
By admin | Updated: May 11, 2017 04:12 IST