पुणे : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होत असलेल्या कामांत दिरंगाई, कामांच्या जागा व बजेट परस्पर बदलले जातात, अशा तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या आहेत. त्यामुळे या कामांचा आढावा घेऊन तेथे जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी अचानक भेटी देणार असून, जर त्यात तथ्य आढळले तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा ठराव आज जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत घेण्यात आला.शिवसेनेच्या गटनेत्या आशाताई बुचके यांनी डिंगोरे येथील बंधाऱ्याच्या कामाबाबतचे वास्तव आजच्या बैैठकीत मांडले. त्यावर चर्चा झाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना व जलसंधारणाच्या कामांचा गेल्या ५ वर्षांचा आढावा आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. हा आढावा आल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी कामे रखडली आहेत किंवा त्या कामांबाबत तक्रारी आहेत, त्या कामांवर जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी तसेच सदस्य अचानक भेटी देणार आहेत. स्वत: अध्यक्षही या कामांना भेटी देणार असून, त्यात दिरंगाई आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसा ठराव आज करण्यात आला आहे. होणारी कामे चांगल्या दर्जाची व वेळेत व्हावीत यासाठी हा ठराव करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सोमवार, शुक्रवारी खातेप्रमुख मुख्यालयातविविध कामांसाठी जिल्ह्यातून ग्रामस्थ जिल्हा परिषदेत येतात. मात्र खातेप्रमुख जागेवर नसल्याने त्यांचे हेलपाटे होतात. त्यामुळे सोमवारी व शुक्रवारी त्या त्या विभागाच्या खातेप्रमुखांनी मुख्यालयात हजर राहणे सक्तीचे आहे, असा ठरावही आज घेण्यात आला. तशा कडक सूचनाही देण्यात आल्या आहेत. जर तातडीच्या कामासाठी त्यांना बाहेर जावे लागणार असेल तर त्यांनी अध्यक्ष, मुख्याधिकारी, त्या-त्या विभागाचे सभापती त्यांची परवानगी घ्यावी.
कामात दिरंगाई आढळल्यास कारवाई
By admin | Updated: October 28, 2015 23:56 IST