पुणे : नॅक मूल्यांकन न केलेल्या विनाअनुदानित महाविद्यालयांवर कारवाई केली जाणार असल्याचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. या संदर्भात सविस्तर माहिती देताना कुलगुरू म्हणाले, की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विनाअनुदानित महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन करून घेण्यासाठी वेळावेळी सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही विनाअनुदानित महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केले नाही. त्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठ व उच्च शिक्षण विभागाने कार्यशाळा घेऊन विनाअनुदानित महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन करून घेण्यासाठी मार्गदर्शन व शिबिर घेतले होते. त्याद्वारे नॅक मूल्यांकन करून घ्या, असे वेळावेळी सूचित केले. पण विनाअनुदानित महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकनाकडे पाठ फिरविली आहे. विनाअनुदानित महाविद्यालये सुरू करीत असताना शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान घेणार नाही, या हमीपत्रावर मान्यता दिली जाते. त्यानंतर आता ही महाविद्यालये विद्यापीठाकडून अनुदान मागत असतील, तर ते चुकीचे आहे. याबाबत या संस्थांनी शासनस्तरावरून प्रयत्न करायला हवेत. अशा परिस्थितीत नॅक मूल्यांकन करून न घेतलेल्या महाविद्यालयांवर कारवाई होणार आहे, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले.
नॅक मूल्यांकन नसलेल्या महाविद्यालयांवर कारवाई
By admin | Updated: November 12, 2016 07:10 IST