पुणे : बोगस डॉक्टर विरोधी समितीला एखाद्या बोगस डॉक्टरवर कारवाई करायची असेल, तर त्याची संपूर्ण माहिती व पुरावे गोळा करा, त्यानंतर विधी सल्लागारांचा अभिप्राय घ्या, मगच कारवाई करा, असा अजब निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे बोगस डॉक्टरांवर कारवाई करणे अत्यंत अवघड बनले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शहरातील बोगस डॉक्टरांविरुद्ध मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाला खडबडून जाग आली. त्यांनी बोगस डॉक्टरांची यादी तयार करून कारवाई करण्यास सुरुवात केली होती. गेल्या दोन वर्षांत अनेक बोगस डॉक्टरांना त्यांचा गाशा गुंडाळावा लागला. मात्र, आता यापुढे बोगस डॉक्टरांवर कारवाई करणे अवघड बनले आहे.बोगस डॉक्टर विरोधी समितीची नुकतीच बैठक झाली. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, प्रभारी आरोग्य प्रमुख एस. टी. परदेशी, सहायक आरोग्य प्रमुख वैशाली जाधव, विधी सल्लागार मंजूषा इधाटे यांच्यासह बोगस डॉक्टर विरोधी समितीचे सदस्य या बैठकीला उपस्थित होते. ‘‘बोगस डॉक्टरांवर सरसकट कारवाई करू नका. पहिल्यांदा त्यांची संपूर्ण माहिती व पुरावे गोळा करा. त्यानंतर विधी विभागाचा अभिप्राय घ्या. मग आम्ही सांगू कारवाई करायची की नाही,’’ अशा स्वरूपाचे स्पष्ट निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये दिले आहेत. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांकडे तक्रार विधी सल्लागार समितीच्या अभिप्रायावर त्यांना ताटकळत ठेवणे चुकीचे असून, याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे अनेक बोगस डॉक्टरांना पकडून देणारे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी स्पष्ट केले.नातेवाइकामुळे वरिष्ठाने घातले दंडकमहापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नातेवाईक असलेल्या बोगस डॉक्टरवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यामुळे चिडलेल्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे अधिकारच काढून घेतले असल्याची चर्चा पालिकेत सुरू होती.
बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई बनली अवघड
By admin | Updated: January 21, 2015 00:34 IST