पुणे : पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाने अनधिकृत नळजोडांवर कारवाई सुरू आहे. प्रामुख्याने सार्वजनिक नळकोंडाळी, व्यावसायिक पाणी वापर, तसेच अनधिकृत नळजोड अशी दोन दिवसांत १०० ठिकाणी कारवाई करण्यात आली, अशी माहिती अधीक्षक अभियंता मदन आढारी यांनी आज दिली. खडकवासला धरण क्षेत्रातील पाणीसाठा घटला आहे. त्यामुळे महापालिकेने एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला आहे. परंतु, सार्वजनिक नळकोंडाळे व अनधिकृत नळजोडाद्वारे पाण्याचा गैरवापर सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर एसएनडीटी, पर्वती व लष्कर या तीन पाणीपुरवठा विभागामार्फत शहरात कारवाई सुरू आहे. विद्युत मोटारी जप्त करण्यात येत आहेत. तसेच, अनधिकृत नळजोड तोडून संबंधितांना हजारोचा दंड आकारण्यात आला आहे. पुढील काळात ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे, असे आढारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अनधिकृत नळजोडांवर १०० ठिकाणी कारवाई
By admin | Updated: July 16, 2014 04:02 IST