पिंपरी : दुभाजकाला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना चिंचवड येथे घडली. तर दुसरी घटना मोटारीच्या धडकेने भोसरीत दुचाकीस्वार जागीच ठार झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दास मारुती भोईर (वय ६०, रा. केशवनगर, चिंचवड) हे दुचाकी भरधाव चालवीत असताना त्यांची दुचाकी रस्त्यावरील दुभाजकाला धडकली. या अपघातात भोईर हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी घटना भोसरी येथे घडली. भरधाव मोटारीची धडक बसून किरण हेमंत देशपांडे (वय ३४, रा. शांतीनगर, भोसरी) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून जात असलेल्या मोटारीची दुचाकीला पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे धडक बसली. या अपघातात किरण देशपांडे गंभीर जखमी झाले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मोटारचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. याप्रकरणी अज्ञात मोटारचालका विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अपघातानंतर त्या ठिकाणी न थांबता पोलिसांना माहिती न देता वाहनचालक तेथून पसार झाला. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून भरधाव वेगाने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या घटना अधिक घडू लागल्या आहेत. तसेच अपघातस्थळी जखमींना सोडून पळून जाण्याचे प्रकार घडत आहेत. (प्रतिनिधी)
भोसरी, चिंचवडमध्ये अपघात; दोन ठार
By admin | Updated: December 25, 2015 01:42 IST