लोणी काळभोर : सहा वर्षांपूर्वी दत्तात्रय बाप्पू पवार (रा. वानेवाडी, रामनगर, ता. बारामती) यांचा खून करून येरवडा जेल पुणे येथे जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोल रजेवर आल्यानंतर पुन्हा येरवडा जेल पुणे येथे हजर न राहणाऱ्या फरार आरोपी संजय भिकू गाडे (वय ४२, सध्या रा. सस्तेवाडी, आनंदनगर, ता. बारामती) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी सांगितले.मृत दत्तात्रय बाप्पू पवार याने संजय भिकू गाडे यांच्याकडून ५०० रुपये हातउसने घेतले होते, त्यापैकी ४०० रुपये माघारी दिले होते, तरीदेखील आरोपी संजय गाडे दत्तात्रय पवार याला ५०० रुपये मागू लागला त्यावरून या दोघांच्यात ९ आॅक्टोबर २००२ रोजी वानेवाडी येथे भांडण झाले. त्यामध्ये गाडे याने पवार यांच्या डोक्यात विळ्याने वार केल्याने पवार यांचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यामध्ये गाडे यास वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली होती. या केसमध्ये सत्र न्यायालय बारामती यांनी आरोपीस जन्मठेप व ५००० रुपये दंडाची शिक्षा केली होती.या गुन्ह्यामध्ये आरोपी संजय गाडे येरवडा कारागृह पुणे येथे शिक्षा भोगत होता. दरम्यान, सन २०११ मध्ये तो पॅरोल रजेवर घरी आला होता. त्यानंतर तो रजा संपली तरी पुन्हा हजर झाला नाही, तेव्हापासून तो वेगवेगळ्या नावाने या भागात राहत होता. हा आरोपी सस्तेवाडी आनंदनगर भागात राहत असल्याची खबर पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे आणि पोलीस नाईक नीलेश कदम यांना खबऱ्यामार्फत मिळाली, त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, नीलेश कदम, नितीन दळवी, विघ्नहर गाडे यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी संजय भिकू गाडे (वय ४२, रा. सस्तेवाडी, आनंदनगर, ता. बारामती, जि. पुणे) यास जेरबंद केले. (वार्ताहर)
येरवडा जेलमधील फरार आरोपीला पकडले
By admin | Updated: March 11, 2017 03:08 IST