अवसरी : नळाला दूषित पाणी आल्याने ४० ते ४५ जणांना उलट्या व जुलाब झाले. या रुग्णांना खासगी व सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील गावात ही घटना घडली. नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी खालची वेस येथील ग्रामस्थ करीत आहेत. अवसरी खुर्द येथे १ कोटी ५लाख रुपये खर्च करून सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेचे काम चालू आहे. संबंधित ठेकेदाराने गावठाण अंतर्गत मुख्य रस्ते खोदून पाईपलाईन टाकण्याचे काम चालू केले आहे. चार दिवसांपूर्वी खालची वेस ते सुतार आळीदरम्यान पाईपलाईनचे काम चालू असताना जुन्या पाईपलाईनच्या नळजोडणीचे घरगुती नळाचे पाईप तुटले. शेजारून गेलेल्या गटार योजनेचे पाईप फुटले. नळाच्या पाईपमध्ये गटाराचे पाणी गेल्याने आज गुरुवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी पाणी प्यायल्यानंतर ४० ते ४५ जणांना जुलाब-उलट्यांचा त्रास चालू झाला. हे प्रमाण अधिकच वाढत चालल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी सकाळी ९ वाजता मंगल शरद लोणकर, सुरेखा लोणकर, हरीश सुभाष निळकंठ, जनाबाई टेमकर, मनीष लोणकर, कल्पना भालेराव, गणेश बारसकर, यश योगेश थोरात, मंगल राजू जैजाळ यांच्यासह २५ ते ३० रुग्णांना सलाईन लावण्यात आले आहे. (वार्ताहर)1संबंधित ठेकेदाराने नळ पाणीपुरवठा योजनेचे काम करत असताना गावातील अनेक घरांतील नळजोड जेसीबीने तोडले आहेत. हजारो रुपये खर्च करून नवीन पाईप टाकावे लागले आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी ठेकेदाराकडे तक्रार केल्यास, नळ जोडून देण्याचे आमचे काम नाही तुम्ही ग्रामपंचायतीला सांगा, अशी अरेरावीची उत्तरे दिली जातात. काम बंद करेन, अशी धमकी देतात, असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. ठेकेदार ग्रामपंचायतीलासुद्धा जुमानत नाहीत. 2संबंधित ठेकेदाराने खालची वेस येथील नळयोजनेची जुनी पाईपलाईन फोडली नसती. हे दोन्ही पाईप भक्कमपणे लिकेज काढले असते, तर ही वेळ आमच्यावर आली नसती, अशी तक्रार मनीषा लोणकर व हरीश निळकंठ यांनी केली आहे.
अवसरीकरांना उलट्या, जुलाब
By admin | Updated: October 30, 2015 00:10 IST