पुणे : एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे कोषाध्यक्ष विंग कमांडर अभय जोशी यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी (२६ नोव्हेंबर) निधन झाले.
स्वातंत्र्यसैनिक एस. एम. जोशी यांचे ते द्वितीय चिरंजीव होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे आहेत. वैकुंठ स्मशानभूमी येथील विद्युतदाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भारतीय वायुदलातून विंग कमांडर म्हणून निवृत्त झालेल्या अभय जोशी यांनी पाकिस्तानविरुध्दच्या दोन युध्दात सहभाग घेतलेला होता. निवृत्तीनंतर त्यांनी एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. अभय जोशी यांनी स्वकष्टार्जित संपत्तीतून अनेक गरजू आणि होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य व कार्यकर्त्यांना आजारपणात आर्थिक सहकार्य केलेले आहे. धार्मिक कट्टरतावादाविरोधात सतत भूमिका घेत या विषयावर ते लिखाणही करायचे.
एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे विश्वस्त आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली. अभय जोशी आदरांजली सभा येत्या २९ नोव्हेंबरला एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन येथे सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आली आहे.