लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विधानसभा निवडणुकीत विजेचे दर ३० टक्के कमी करण्याचे आश्वासन दिले, सत्तेत आल्यावर वीजबिल कमी करणे तर दूरच पण वाढीव वीज बीले पाठवून ती वसूल करण्याची मोहिम आखली जात आहे. याचा निषेध करत असल्याचे सांगत आम आदमी पार्टीने (आप) शिवसेनेच्या निवडणुकीतील वचननाम्याची होळी केली.
“कोरोना काळातील टाळेबंदीमुळे गरीबांची आर्थिक अवस्था हलाखीची झाली आहे. त्यात वाढीव वीज बीले पाठवून सरकारने मीठ चोळले. त्यानंतर ती कमी करू असे आश्वासन दिले व आता पुन्हा वसुली केली जात आहे. हा तुघलकी खाक्या बंद होत नाही तोपर्यंत ‘आप’च्या वतीने ठिकठिकाणी अशी आंदोलने केली जातील,” असे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी यावेळी सांगितले.
औंध रस्ता येथील इंदिरा वसाहतीमधील विकास लोंढे, रोहित घडसिंग, दिपक शिंदे, ईश्वर तुजारे, संजय वाघमारे, निलाबाई दगडे, मंगल तुजारे, राईबाई तुजारे, सरस्वती जाधव,सतीश यादव, अमोल बगाडे, विक्रम गायकवाड, सादिक अली सईद, प्रकाश जाधव व अन्य स्थानिक नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.