तळेगाव दाभाडे : तळेगाव स्टेशन येथील बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ९५ तोळे सोन्याचे दागिने व २० हजार रुपये घेऊन पोबारा केला.ही जबरी घरफोडीची घटना भरदिवसा शुक्रवारी दुपारी सव्वाबारा ते तीनच्या सुमारास तळेगाव स्टेशन येथील फ्लोरा सिटी येथे घडली. दुसऱ्या घरफोडीतील मुद्देमाल किती गेला हे रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून समजले नाही. शहर परिसरात घरफोड्यांचे सत्र सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन ज्ञानेश्वर भेगडे (रा. स्वराजनगरी) यांच्या घरी ३१ जानेवारी २०१६ रोजी चोरट्यांनी घरफोडी करून ८५ तोळे सोने व १३ लाख रोकड चोरून नेली. दीर्घ कालावधी उलटूनही चोरट्यांचा शोध घेण्यास पोलिसांना अद्याप यश आले नाही. त्यामुळे या चोरीचा शोध लागणे पोलिसांपुढे आव्हान ठरले आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश दयानंद केदार (वय ४५ रा. फ्लोरा सिटी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे ) हे शुक्रवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास फ्लॅट बंद करून बाजारात व नातेवाइकांकडे गेले होते. दुपारी तीन वाजता परतले असता घरफोडीचा प्रकार उघडकीस आला.लगतच्या अविनाश उमाकांत परदेशी यांच्या बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानपथक चोराचा माग काढू शकले नाही. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, उपविभागीय अधिकारी अक्षय शिंदे, निरीक्षक मुगुट पाटील, सहाय्यक निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी भेट देऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)
तळेगावात ९५ तोळे सोने लंपास
By admin | Updated: April 29, 2017 04:15 IST