प्रियांका लोंढे, पुणेपुण्यातील खडकवासला, मुळशी, कवडीपाट तलाव, पाषाण तलाव, वीर धरण, मुळा-मुठा पक्षी अभयारण्य, नाईट बेट (संगमवाडी) कासारसाई, ट्रिपल आयटी, एआरएआय टेकडी या ठिकाणच्या पाणवठ्यावरील पाणपक्ष्यांची प्रथमच वनविभागातर्फे गणना करण्यात आली आहे. या सर्वेक्षणामध्ये विविध प्रजातींचे पक्षी आढळून आले आहेत.वनविभागातर्फे करण्यात आलेल्या या गणनेमध्ये पक्षितज्ज्ञ, पक्षिप्रेमी, तज्ज्ञ आणि विविध सामाजिक संस्थांनी सहभाग दर्शविला होता. दुर्बिणी, पुस्तके आणि काही डाटा यांच्या आधारे पक्षी ओळखून त्यांची गणना केली गेली. पुण्यातील १० पाणवठ्यांवर सामूहिक गट करून पक्ष्यांचे निरीक्षण केले गेले. सकाळी ६ ते सायंकाळी ७ या कालावधीमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये ७०० च्या आसपास पाणपक्ष्यांच्या प्रजाती दिसल्याची नोंद झाली आहे. खडकवासला धरणावर ६०० च्या आसपास प्रजाती पाहायला मिळाल्या असून, तेथे ‘कॉमन फुट’ या प्रजातीचे पक्षी सगळ्यात जास्त असल्याचे दिसले. कासारसाई धरणावर १५० प्रजाती दिसल्या. यामध्ये ‘इंडियन स्पॉट बिल’ सर्वाधिक दिसले. नाईट बेट (संगमवाडी) येथे ७०० च्या आसपास प्रजाती दिसल्या. यामध्ये ‘ब्लॅक विंग्ड स्टील्ट’ ही प्रजाती सर्वात जास्त पाहायला मिळाली. मुळशी डॅमवर ७० प्रजातींमध्ये ‘टफ डक’ या प्रजातीचे प्रमाण जास्त होते. कवडी लेकवर १०६ प्रजातींमध्ये सॅन्ड पायपर ही प्रजाती सर्वात जास्त असल्याचे दिसले. प्राण्यांची गणना काही ठरावीक कालावधीनंतर केली जाते. पाणवठ्यावरील पक्ष्यांची गणना प्रथमच झाली आहे. पाणवठ्यावरील पक्ष्यांंच्या अधिवासाची दखल घेणे महत्त्वाचे असल्याने पाणपक्ष्यांचे सर्वेक्षण केले आहे. आजच्या काळात पक्षिवैभव धोक्यात आले असून, काही पक्षी तर कालवश होण्याच्या मार्गावर आहेत. अशातच पाणपक्ष्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या अधिवासासाठी प्रयत्न करणे हे खरच वन्यजीवांच्या जतन आणि संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, असे मत पक्षिप्रेमींनी व्यक्त केले आहे.
पुणे परिसरात पक्ष्यांच्या ७०० प्रजाती
By admin | Updated: June 10, 2015 05:41 IST