लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहराच्या मध्यवस्तीमधून वाहणारी मुठा नदी मृतावस्थेत असून या नदीमध्ये झालेल्या प्रदुषणापैकी तब्बल ७० टक्के प्रदुषण सांडपाण्यामुळे होत आहे. स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये नदीच्या प्रवाहात विविध प्रकारची घातक रसायने मिसळली जात आहेत. त्यामुळे नदी मृतावस्थेत जाण्यास सांडपाण्यावर न होणारी प्रक्रिया कारणीभूत ठरत आहे.
खडकवासल्यापासून ग्रामीण भागात प्रवेश करेपर्यंतचा १६ किलोमीटरचा प्रवाह प्रदुषित झाला आहे. नांदेड सिटी, वडगाव बुद्रुक, आनंदनगर, शिवणे, वारजे, कोथरूड, विठ्ठलवाडी, शिवाजीनगर या भागात प्रदूषणाची पातळी वाढल्याचे पहायला मिळते आहे.
शहराशेजारी कोणत्याही मोठ्या औद्योगिक वसाहती अथवा मोठे कारखाने नाहीत. तरीदेखील नदीच्या प्रवाहात रसायने आढळत असल्याने हे प्रदूषण कोठून होते, याचा शोध घेणे आवश्यक बनले आहे. पालिकेच्या दहा मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांमधून (एसटीपी) पूर्ण क्षमतेने प्रक्रिया केली जात असल्याचा दावा अर्धसत्य असल्याचे स्वयंसेवी संस्थांचे म्हणणे आहे.
सांडपाण्यातील केमिकल ऑक्सिजन डिमांड (सीओडी) वाढल्यास पालिकेच्या एसटीपींमध्ये त्यावर प्रक्रियाच होत नाही. त्यावेळी प्रक्रिया न करताच हे पाणी नदीमध्ये सोडले जाते. लोकसंख्येचा विचार केल्यास पुणे शहरात आणि उपनगरांमधून सांडपाण्याची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे पाणी सांडपाणी वाहिन्यांमधून तसेच नाल्यांमधून नदीमध्ये जाऊन मिळते. एसटीपींमध्ये जाणा-या सांडपाण्यापेक्षा थेट नदीपात्रात जाणा-या सांडपाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नदीच्या काठी वसलेल्या गावांमध्ये प्रचंड अडचणी येत आहेत. या प्रदुषणयुक्त पाण्यामुळे तेथील ग्रामस्थांना विविध आजारांचा सामना करावा लागतो आहे. या गावांमधील जलस्त्रोतही त्यामुळे प्रदुषित होऊ लागले आहेत.
====
नदीमध्ये विविध रुग्णालयांमधील रसायनमिश्रीत पाणी, तारांकित हॉटेलांमधील प्रदुषित पाणी, मोटार गॅरेज तसेच वॉशिंग सेंटरमधील पाणी नदीमध्ये सोडले जाते आहे.
====